तलासरीतील खलाशाचा पाकच्याकैदेत मृत्यू
By admin | Published: December 6, 2014 02:47 AM2014-12-06T02:47:26+5:302014-12-06T02:47:26+5:30
पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगत असताना आदिवासी खलाशी जान्या लहान्या ईभाड (५०) जि. पालघर, ता. तलासरी याचा ४ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला.
बोर्डी : पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगत असताना आदिवासी खलाशी जान्या लहान्या ईभाड (५०) जि. पालघर, ता. तलासरी याचा ४ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल महिन्याभराने शुक्रवारी ५ डिसेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी डोंगरीपाडा येथील जान्या हा गुजरातच्या दीव बंदरातील मासेमारी बोटीवर खलाशाचे काम करीत होता. एप्रिल महिन्यात मासेमारी बोट पाक हद्दीत गेल्याप्रकरणी साथीदारांसह अटक करून कराची येथे तुरुंगात डांबले होते. तब्येत खालावून ४ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य साथीदारांनी जान्याच्या कुटुंबीयांना पत्राद्वारे ही माहिती दिली. या प्रकरणात येथील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश सांबर यांनी खा. चिंतामण वनगा यांच्याशी संपर्क साधला. वनगा यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली.
पाकिस्तानातील भारताचे हायकमिशनर नरेश बत्रा यांनी पाक शासनाशी संपर्क साधला त्यानंतर कराचीमार्गे मुंबईला विमानाद्वारे मृतदेह आणण्यात आला. यावेळी बोटमालक रामजी सोलंकी यांना बोलावण्यात आले होते. शुक्रवारी मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला. (वार्ताहर)