वाढदिवशीच मृत्युदंड !
By admin | Published: July 30, 2015 01:29 AM2015-07-30T01:29:24+5:302015-07-30T01:29:24+5:30
त्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी
- नरेश डोंगरे, नागपूर
त्रेपन्नाव्या वाढदिवशीच याकूब अब्दुल रझाक मेमन याला फाशी देण्यात येणार असल्याने याकूबसह त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. त्याला फाशी दिली जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांनी याकूबचा भाऊ सुलेमान मेमन याला काही प्रश्न केले. तो कसाबसा भावना आवरत म्हणाला, की माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे.
बुधवारी सकाळी ८.३०च्या सुमारास सुलेमान मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहोचला. त्याला आधी दुपारी याकूबची भेट होईल, असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर याकूबची भेट होईल, असे कळविण्यात आले. त्यामुळे सुलेमान सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला. सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या याचिकेवर दिलेल्या निकालापाठोपाठ राज्यपालांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले. तेव्हा दुपारी ४.३० वाजता तो खाली आला. माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर त्याने सुरुवातीला माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे, असे सांगितले. पण आता काय करणार, हा आणि अन्य काही प्रश्न केले असता ‘प्लीज, लिव्ह मी अलोन’ असे तो जवळपास ओरडतच म्हणाला.
त्याने ते हॉटेल सोडले आणि कारागृहाकडे जायला निघाला. मात्र मधेच चालकाला त्याने कार रेल्वे स्थानकावर वळवायला लावली. एका कोपऱ्यात कार थांबवायला लावून त्याने हमसून हमसून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली अन् नंतर अज्ञात स्थळी निघून गेला. दुसरीकडे याच हॉटेलमध्ये मंगळवारपासून मुक्कामी असलेला चुलत भाऊ उस्मान मेमनने दुपारी ४.३० ला आपल्या रूमचे दार लावून घेतले. मी म्हणेन तोपर्यंत कुणीही काहीही विचारायचे नाही, अशा सूचना त्याने हॉटेल व्यवस्थापनाला दिल्या.
गेल्या आठ वर्षांपासून याकूब नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ३० जुलै त्याची जन्मतारीख असल्यामुळे आतापावेतो प्रत्येक वर्षी त्याचे नातेवाईक वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला येऊन त्याची भेट घ्यायचे. त्याच्याशी गप्पा करणे, गोडधोड खाऊ घालणे, असे प्रकार व्हायचे.
याकूब फाशीचा कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनही गेल्या वर्षीपर्यंत वाढदिवसाच्या दिवशी याकूब आणि त्याच्या कुटुंबीयांना या गोष्टीसाठी सूट देत होते. मात्र १४ जुलैला याकूबचा डेथ वॉरंट घोषित झाल्यापासून व वाढदिवसालाच अर्थात ३० जुलैला फाशी देण्याचे ठरल्यामुळे कारागृह प्रशासन प्रत्येक गोष्ट जेल मॅन्युअलप्रमाणे करीत आहे.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही बर्थ डे केक पाठवू. मध्यरात्री तो कापला जावा, अशी सूचनावजा विनंती याकूबच्या नातेवाइकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. प्रशासनाने तीसुद्धा फेटाळली.