निष्पाप युगची हत्या करणा-या राजेश आणि अरविंदला फाशीची शिक्षा
By admin | Published: February 4, 2016 11:47 AM2016-02-04T11:47:51+5:302016-02-04T11:47:51+5:30
बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ - बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
राजेश धनालाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंगने दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे या आरोपींनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून अपहरण केले होते.
अपहरणकर्त्यांनी आधी १० कोटी आणि नंतर ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यांनी युगचा दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निर्घृणपणे खून केला होता. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी खुद्द दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुली देऊन नाल्यातील रेतीमध्ये पुरलेला युगचा मृतदेह दखवला होता.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. सरकार पक्षाने एकूण ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासलेले होते.