वसईत धावत्या रेल्वेमधून उतरताना धावपटूचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 05:07 AM2017-02-10T05:07:36+5:302017-02-10T05:07:36+5:30
धावत्या स्वराज्य एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना लोकेश वाघमारे या धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना आज वसई रेल्वे स्थानकात घडली.
वसई : धावत्या स्वराज्य एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना लोकेश वाघमारे या धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना आज वसई रेल्वे स्थानकात घडली.
वसईला राहणारा लोकेश गुजराथच्या बडोदा येथे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. या स्पर्धेत त्याने दुसरा क्र मांक पटकावला होता. ही स्पर्धा आटोपून लोकेश स्वराज्य एक्स्प्रेसने मुंबईला परतत होता. या एक्सप्रेसला वसई रोड स्थानकात थांबा नाही. मात्र वसई रोड स्थानकात गाडीचा वेग कमी होताच लोकेशने त्या संधीचा फायदा घेत फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु नेमक्या त्याच वेळेस गाडीने गती पकडली आणि लोकेश पाय घसरून पडला. या अपघातात जखमी झाल्याने लोकेशचा मृत्यू झाला.
लोकेश वसई पूर्वेच्या गवराईपाडा येथील दुर्गानगर चाळीत रहात होता. राष्ट्रीयस्तरावर त्याने अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. त्याची आई घरकाम करते. त्याला दोन बहिणी असून आई आणि लोकेश हेच घरातील कमावते होते. (प्रतिनिधी)