मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सांबराचा मृत्यू
By admin | Published: March 13, 2016 01:16 AM2016-03-13T01:16:47+5:302016-03-13T01:16:47+5:30
एकीकडे अभिनेता सलमान खानने सांबराची शिकार केली म्हणून सर्वांनी आवाज उठवला. पण दुसरीकडे मागील काही वर्षांत भीमाशंकर अभयारण्यात मोकाट कुत्र्यांमुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचा जीव गेला
भीमाशंकर : एकीकडे अभिनेता सलमान खानने सांबराची शिकार केली म्हणून सर्वांनी आवाज उठवला. पण दुसरीकडे मागील काही वर्षांत भीमाशंकर अभयारण्यात मोकाट कुत्र्यांमुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचा जीव गेला आहे. मात्र याकडे वनविभाग तसेच इतर प्राणीप्रेमी आणि नागरिक तितक्या तत्परतेने विशेष लक्ष देताना दिसत नाहीत. भीमाशंकर अभयारण्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शुक्रवारी सांबराचा मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सांबर, भेकर, मोर, ससे यांची शिकार वाढू लागल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी (दि.११) मंदिराजवळील वस्तीकडे एक सांबर पळत आले, त्याच्यामागे आठ ते दहा मोकाट कुत्री होती. हे जखमी सांबर मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून स्थानिक लोकांनी सोडविले; मात्र उपचाराचापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांपासून भीमाशंकरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. आजपर्यंत कित्येक सांबरांची शिकार या कुत्र्यांनी केली आहे. कुत्री ही संरक्षित प्राण्यांमध्ये येत असल्यामुळे वन्यजीव विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरतात. पुण्या-मुंबईतील काही प्राणीप्रेमी संघटना, धार्मिक लोक कुत्र्यांना मारले, तर हरकत घेतील म्हणून काहीही कारवाई होत नाही.
गेल्या काही वर्षांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जंगली प्राणी मेल्याच्या अनेक घटना स्थानिक लोकांनी पाहिल्या आहेत. याशिवाय जंगलात आतमध्ये अशी किती सांबर, भेकर, ससे, मोर, कुत्र्यांनी मारली असतील याची गणना नाही.
दिवसेंदिवस भीमाशंकरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे कचरा, घाण वाढली, यामुळे कुत्र्यांची संख्याही वाढत चालली आहे. ही मोकाट कुत्री १५ ते २०च्या समूहाने जंगलात फिरतात. जंगली प्राण्यांना घेरून मारतात. कधी काळी भीमाशंकर जंगलात वाघांची दहशत होती. आता मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. या मोकाट कुत्र्यांवर लवकर नियंत्रण आणले नाही, तर ही कुत्री थोड्याच दिवसांत जंगलातील प्राणी संपवतील. नंतर जंगलात फिरणाऱ्या लोकांवर हल्ला करतील. हा मोठा धोका सध्या भीमाशंकर अभयारण्याला निर्माण झाला आहे. स्थानिक लोकही या मोकाट कुत्र्यांना त्रासले आहेत.
शुक्रवारी (दि.११) भीमाशंकर मंदिराजवळील गुप्तभीमाशंकर रस्त्याकडे जंगलातून एक सांबर,
मागे लागलेल्या आठ ते दहा कुत्र्यांपासून जीव वाचवीत वस्तीकडे पळत आले. त्याला स्थानिक तरुणांनी पाहिले व त्या सांबराची कुत्र्यांच्या
तावडीतून सुटका केली. या वेळी देवस्थानचे विश्वस्त प्रशांत काळे, राजेश काळे यांनी वनअधिकाऱ्यांना
ही घटना कळवली. मात्र वनकर्मचारी येईपर्यंत या सांबराचा मृत्यू
झाला होता.
>माकडांचा उपद्रव वाढला;
बंदोबस्ताची मागणी
भीमाशंकरमध्ये मोकाट कुत्र्यांप्रमाणेच माकडांचाही उपद्रव वाढला आहे. पायऱ्यांनी जाणाऱ्या भाविकांच्या पिशव्या ओढून त्यातील खाद्यपदार्थ ही माकडे हिसकावून घेतात, काही भाविकांना माकडांनी चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पूर्वी जंगल सोडून इतरत्र ही माकडे कधीही दिसत नव्हती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांतच पायऱ्यांवर माकडांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला येणारे भाविक या माकडांना शेंगा, मक्याची कणसे, मुरमुरे, पेढे असे खाद्य टाकू लागले. त्यामुळे त्यांना सोपे व आवडीचे खाद्य मिळाले, यामुळेच माकडांची संख्या वाढली. माकडांच्या उपद्रवाचा त्रास यात्रेकरूंबरोबरच स्थानिक लोकांनाही होऊ लागला आहे. त्यामुळे या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी भीमाशंकरचे ग्रामस्थ करू लागले आहेत.