गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By admin | Published: December 22, 2016 04:06 AM2016-12-22T04:06:45+5:302016-12-22T04:06:45+5:30
बांधकाम व्यावसायिक समजून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
डोंबिवली : बांधकाम व्यावसायिक समजून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी मानपाडा रोडवरील अंगण हॉटेलसमोर घडली. या घटनेत सुरक्षारक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९, रा. वांगणी) यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
काटई गावातील संगीता निवासमध्ये बांधकाम व्यावसायिक अमित पाटील राहतात. वांगणी आणि डोंबिवलीत त्यांची बांधकामे सुरू आहेत. पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून काटई परिसरात सामाजिक कार्येही करतात. अमित बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास विकीसोबत बाहेर जाण्यासाठी गाडीतून निघाले होते. मात्र, त्या वेळी अमित यांनी घरातून काही तरी आणण्यासाठी विकी यांना पुन्हा आपल्या घरी पाठवले आणि ते गाडीत चालकाच्या जागेवर बसून वाट पाहत होते. विकी काही मिनिटांत परतले, परंतु तेथे दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यालाच अमित पाटील समजून गोळीबार केला. त्यात विकी यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यानंतर हल्लेखोर साथीदाराच्या दुचाकीवरून कल्याण-शीळमार्गे पळून गेले.
पाटील आणि परिसरातील नागरिकांनी विकी यांना शिवाजी उद्योगनगरमधील आॅप्टिलाइट या खासगी रु ग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातून गोळी काढली मात्र तरिही त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, नारायण देशमुख यांनी काटई येथील घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, रमेश जाधव आदींनी रुग्णालयात धाव घेतली. अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार यांनीही घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराचे कारण समजले नसले तरी हा हल्ला व्यावसायिक अथवा राजकीय वैमनस्यातून झाला असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)