ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 03:11 PM2017-09-02T15:11:37+5:302017-09-02T15:38:51+5:30
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई, दि. 2- ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे. शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचा श्रेय शिरीष पै यांना जातं
त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली होती. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला.
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील या कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलं. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तकंही गाजली. आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही त्यांची ललित साहित्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
वडिलांकडून मिळाला लेखनाचा वारसा
वडील आचार्य अत्रे यांच्याकडून लेखनाचा वारसा शिरीष पै यांना मिळाला. मुंबईला लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या ‘नवयुग’च्या कार्यालयात जाऊन बसायचा. त्या वेळी नवयुगमध्ये प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके आचार्य अत्रे यांना मदत करायच्या. काही कारणांमुळे शांताबाईंनी ‘नवयुग’ सोडलं. त्यावेळी शांताबाई शेळके यांच्या सारखी लिखाण करणारी दुसरी व्यक्ती मिळत नसल्याने शांताबाईंचं काम मी पाहू का? असं शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांना विचारलं होतं. वडिलांचा होकार मिळताच शिरीष पै यांनी ‘नवयुग’चं काम सुरू केलं. लिहायची सवय त्यांना तेव्हापासून लागली.
‘लिहीत राहा..’
१६व्या वर्षी शिरीष पै यांची कथा प्रसिद्ध झाली ती भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौखालीमध्ये जे अत्याचार घडले त्यावर आधारित होती. ‘नवशक्ती’चे त्या वेळचे संपादक प्रभाकर पाध्ये यांना ती कथा आवडली. नंतर सर्व साहित्याचे ते एक मोठे वाचक बनले. शिरीष पै यांना लहानपणापासून कवितेची, कथेची आवड. मॅट्रिकला असताना त्या संस्कृत शिकत होत्या. संस्कृत विषय त्यांचा उत्तम होता. त्यावेळी मुंबई विद्यापीठात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. बी.ए.चं शिक्षण घेत असताना त्यांना मराठी घ्यायचं होतं. पण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच आचार्य अत्रे यांनी अर्थशात्र घ्यायला लावलं. त्या वेळी आचार्य अत्रे ‘नवयुग’चे संपादक होते आणि शांताबाई शेळके नवयुग सोडून गेल्या होत्या. त्याप्रसंगी आचार्य अत्रे यांनी शिरीष पै यांना ‘आता तूच काम सुरू कर, असं सांगितलं होतं. १०० रुपये पगारावर शिरीष पै यांची नेमणूक झाली होती.
चित्रपट परीक्षण सुरू केलं
लिखाणाचं काम सुरू असताना शिरीष पै यांनी सिनेमांचं परीक्षणही केलं. अभिनेत्री नर्गीसची मुलाखत, राज कपूर यांची मुलाखत, बलराज सहानीची मुलाखत, वसंत देसाईंची मुलाखत अशा मुलाखती गाजत राहिल्या. तेव्हा नवयुग’चे सहसंपादक दत्तू बांदेकर होते. त्यांनी शिरीष पै यांना लिखाणाची खूप संधी दिली तसंच खूप प्रोत्साहन दिलं. १९५३ ते १९६१ हा शिरीष पै यांचा ‘नवयुग’मधला सुवर्णकाळ होता.