स्कूलबसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: February 15, 2017 03:29 AM2017-02-15T03:29:41+5:302017-02-15T03:29:41+5:30
स्कूलबसमधून उतरून रस्ता ओलांडत असणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला दुसऱ्या स्कूलबसने धडक दिल्याची घटना नेरूळ येथे घडली.
नवी मुंबई : स्कूलबसमधून उतरून रस्ता ओलांडत असणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला दुसऱ्या स्कूलबसने धडक दिल्याची घटना नेरूळ येथे घडली. यात जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी स्कूलबसचालकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळ सेक्टर २० येथे सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. संवेद परागडा (९) असे मयत मुलाचे नाव असून, तो स्टर्लिंग शाळेचा दुसरीतील विद्यार्थी आहे. सोमवारी शाळा सुटल्यानंतर तो स्कूलबसने घरी आला होता. स्कूलबसमधून उतरल्यानंतर तो रस्ता ओलांडत होता. या वेळी त्याची आई रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होती. तो आईच्या दिशेने जात असतानाच त्याच रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी स्कूलबसने त्याला धडक दिली. यामध्ये संवेद गंभीर जखमी झाला. तर अपघातानंतर चालकाने घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला होता. दरम्यान, जखमी संवेदला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पळालेला चालक गोविंदकुमार रॉय यालाही अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)