रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू
By admin | Published: February 10, 2017 05:16 AM2017-02-10T05:16:30+5:302017-02-10T05:16:30+5:30
भिवंडी आगारात बस नेताना धक्का लागल्याने मुजोर रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत केलेल्या अमानुष मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू झाला
भिवंडी : भिवंडी आगारात बस नेताना धक्का लागल्याने मुजोर रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत केलेल्या अमानुष मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी चारपर्यंत बंद पाळला. त्यामुळे एसटी वाहतूक विस्कळीत झाली होती.
ठाणे-भिवंडी ही शेवटची फेरी करून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगारात परतलेल्या बसचा आगाराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या रिक्षास धक्का लागला. रिक्षाचालकाने बसचालक प्रभाकर गायकवाड यांना शिवीगाळ केली. पण गायकवाड यांनी प्रवाशांना उतरवण्यासाठी बस आगारात नेली. वाहक पैसे जमा करण्यासाठी कार्यालयात गेला असताना गायकवाड हे रिक्षाचालकास जाब विचारण्यास गेले. पण तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
याची तक्रार देण्यासाठी गायकवाड शिवाजीनगर येथील पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रारच घेतलीच नाही. त्यामुळे झालेल्या मन:स्तापाने गायकवाड पोलीस ठाण्याच्या आवारातच खाली कोसळले व बेशुद्ध झाले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत रात्रीपासून बंद सुरू केला. गायकवाड हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील अलगारा येथील रहिवासी होते. सध्या ते कांबा गावात आपल्या परिवारासह राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी पूजा हिने निजामपूर पोलीस ठाणे गाठले. फुटेज पाहून रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तर, इंदिरा गांधी रुग्णालयातही वारसाची सही न घेता परस्पर डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याचा आरोप पूजा व त्यांची आई नंदा यांनी केला. जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला.
गायकवाड यांना दोन मुली व एक मुलगा असून एक भाऊ सैन्यात आहे. या घटनेनंतर शहरातील मुजोर रिक्षाचालकांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)