मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
By admin | Published: June 9, 2017 04:36 AM2017-06-09T04:36:52+5:302017-06-09T04:36:52+5:30
देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़
विवेक भुसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़ गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात जूनमध्ये वीज पडून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ़ सुनील पवार यांनी सांगितले़ जनजागृतीचा अभाव आणि देशाच्या अन्य भागापेक्षा येथील वाऱ्याचा वेग व पाऊस यात फरक असल्याने या दुर्घटना घडतात.
ढगात वीज कशी तयार होते, यावर सुनील पवार यांनी डॉक्टरेट केली आहे़ याबाबत त्यांनी सांगितले की, आसाम, कोलकत्ता, बिहार तसेच केरळ येथे महाराष्ट्रापेक्षा वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामानाने आपल्याकडे वीज कोसळण्याचे प्रमाण कमी असूनही त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत ईशान्य भारतात जाऊन आम्ही संशोधन केले़ गेल्या २० वर्र्षांत वाढलेल्या नागरिकीकरणामुळे वीज कोसळून दुर्घटना होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते. नागरिकीकरण झाल्यावर वृक्षांचे अच्छादन कमी होते़ त्यामुळे जमीन तापण्याचे प्रमाण वाढते़ त्याला प्रदूषणाचा हातभार लागून त्यातून ढगामध्ये वीज निर्माण होण्याचे प्रमाण वाढत जाते़