मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: March 27, 2016 03:17 AM2016-03-27T03:17:12+5:302016-03-27T03:17:12+5:30
दुष्काळी मदत कमी मिळाल्याने होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. माधव दिनाजी कदम
मुंबई/नांदेड : दुष्काळी मदत कमी मिळाल्याने होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. माधव दिनाजी कदम (२७, रा. जानापुरी, ता. लोहा, जि. नांदेड) असे त्याचे नाव असून, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचे प्राण गेले. या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सरकारी अनास्थेचा बळी आहे, अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत.
कदम याने २३ मार्च रोजी नवीन प्रशासकीय कार्यालयासमोर कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दक्षिण नियंत्रण कक्षाकडून याची माहिती मिळताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला जी.टी. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
कदम यांना जानापुरी येथे १ हेक्टर ९ गुंठे जमीन असून ती कोरडवाहू आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सरसकट ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे, परंतु त्यातून कापूस आणि हळद वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजे अनुदान येत असल्याबाबत कदम यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची २२ मार्च रोजी भेट घेतली होती़ परंतु समाधान न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी तो २२ मार्च रोजी सायंकाळी रेल्वेने मुंबईला आला होता.