Coronavirus: कुटुंबावर दुखा:चा डोंगर; दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या वडिलांना कल्पनाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:39 AM2021-05-24T11:39:06+5:302021-05-24T11:41:31+5:30
कुटुंबातील सदस्यांना घरकुल कोविड सेंटर येथे दाखल केले. तर आदित्यला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पुणे – कोविड १९ च्या दुसऱ्या देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या लाटेत अनेकांनी त्यांच्या जवळची माणसं गमावली आहेत. कोणाचा आधार गेला तर कोणाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. कोरोनामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी भागात अशीच एक घटना समोर आली आहे. याठिकाणी २ दिवसांत दोघा भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर वडिलांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यांना मुलांच्या जाण्याची बातमी दिलेली नाही.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, मोठ्या भावाचं नाव आदित्य विजय जाधव आहे त्याचे वय २८ वर्ष होतं. तर छोट्या भावाचं नाव अपूर्व विजय जाधव असून तो २५ वर्षांचा होता. अपूर्वचं लग्न झालं नव्हतं तर आदित्यचं १ वर्षापूर्वी लग्न झालं होतं. मृतकाचे मामा हेमंत कोंडे यांनी सांगितले की, दोन्ही भावांचा मृत्यू ७२ तासांच्या कालावधीत झाला. या दोघांना कोरोनाची लागण झाली होती त्याचसोबत दोघंही व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते.
अपूर्वला १ मे रोजी कोरोना झाला होता. तो पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात काम काम करत होता. तर महामारीच्या विळख्यात अडकलेल्या अपूर्वला स्थानिक अधिकाऱ्यांनी भवानी पेठच्या पीएमसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याला रुग्णालयातच कोरोना झाला असावा अशी शंका त्याचे मामा हेमंत कोंडे यांनी व्यक्त केली आहे. अपूर्व खासगी रुग्णालयात दाखल केले. तो २-३ दिवस घरीच होता. जेव्हा तब्येत आणखी बिघडली तेव्हा त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कुटुंबातील आई-वडील, भावांची चाचणीही कोविड पॉझिटिव्ह निघाली.
कुटुंबातील सदस्यांना घरकुल कोविड सेंटर येथे दाखल केले. तर आदित्यला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही दिवसांनी वडिलांना वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आलं. पीपीई किट्स घालून रुग्णांना पाहायला जाणाऱ्या मामाने सांगितलं की, सुरुवातीला अपूर्व बरा होईल असं वाटत होतं. परंतु अचानक त्याची ऑक्सिजन पातळी खालावली. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. तर आदित्यवर व्यवस्थित उपचार होत नव्हते. काही दिवसांनी आम्ही त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यालाही व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं असं मामांनी सांगितले.
आदित्य हा बिल्डर योगेश जैन आणि देवेश जैन यांच्याकडे कामाला होता. त्यांनी उपचारासाठी खूप मदत केली. अपूर्व आणि आदित्यबद्दल बोलताना मामा गहिवरले. हे दोघं भाऊ मेहनती होते. कठीण काळात त्यांनी कुटुंबीयांची मदत केली. त्यांच्या वडिलांना खूप कमी पगार मिळत होता. दोन्ही भावांनी स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. अपूर्वने कोविड काळात पीएमसीमध्ये चांगले काम केले होते असं मामांनी सांगितले.