दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:06 AM2018-02-10T02:06:07+5:302018-02-10T02:06:18+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.
चंद्रपूर/ गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड व गोंदिया या परिसरासाठी नक्षलवाद्यांच्या प्लाटून नं. ५५ च्या डेप्युटी कंमाडर व एक सदस्य अशा दोघांचा छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी सकाळीच झालेल्या चकमकीत खात्मा केला. त्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस होते.
विनोद उर्फ दावेन सेरकुराम कोरेटी (२६) व सागर (२८), अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत. तर रामन्ना आणि पद्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर लाहेरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. हे दोघे बल्लारपुरात असल्याची गोपनीय माहिती नक्षल सेलच्या पथकाला मिळाली होती. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी यांनी आपल्या ताफ्यासह सर्च मोहीम राबविली. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात रामन्ना आणि पद्मा संशयितरित्या फिरताना आढळले.
तांत्रिक बाबी सांभाळायचा रामन्ना
अटक केलेला रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर असून त्याला पकडून देण्यासाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर पद्मा ही एरीया कमिटीची मेंबर आहे. तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. रामन्ना हा मूळचा हैदराबाद राज्यातील असून नक्षल चळवळीत तो तांत्रिक बाबी सांभाळायचा, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली.