दोन सुपुत्रांना वीर मरण !
By admin | Published: January 28, 2017 02:09 AM2017-01-28T02:09:24+5:302017-01-28T02:09:24+5:30
अकोल्यात शोककळा; पंचशील नगरमधील आनंद गवई, मानाचे संजय खंडारे शहीद.
अकोला, दि. २७- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. यामध्ये अकोल्यातील पंचशील नगर भागातील आनंद गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे संजय खंडारे या सैनिकांचा समावेश आहे. ही बातमी कळताच जिल्हाभरातून शोक व्यक्त करण्यात आला. हे दोन्ही सुपुत्र शहीद झाल्याची बातमी कळताच अकोल्यातील पंचशील नगर व माना हे लहानसे गाव पार दु:खात बुडाले.
अकोल्यातील वाशिम बायपास परिसरात पंचशील नगर आहे. सध्या या भागात स्मशान शांतता आहे. या स्मशान शांततेचे कारण आहे, या नगराचा सुपुत्र असलेल्या आनंद गवई या सैनिकाला आलेले वीर मरण. याच भागातील गल्ल्यांमध्ये खेळलेला, बागडलेला आनंद आता आपल्याला कधीच भेटणार नाही, यावर त्याचे मित्र अन् मोहल्ल्यातील कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. आनंद २00८ मध्ये सैन्यामध्ये भरती झाला होता. अकोल्यातील पंचशील नगर भागात राहत असलेल्या आनंदच्या कुटुंबात त्याचे वडील काशीराम आणि गोकर्णा आणि महाराष्ट्र पोलिसांत असलेला त्याच्या मोठा भाऊ धनंजय यांचा समावेश आहे. त्याला चार बहिणी असून सर्वांंचे लग्न झाले आहेत. यावर्षी आनंदचा लग्न करण्याचा विचार होता. महिनाभरापूर्वी आलेल्या २0 दिवसाच्या सुटीत त्याने काही स्थळंही बघितली होती. दोन आठवड्यांनी तो सुटीवर आल्यानंतर घरचे त्याच्या लग्नाची तयारी करणार होते; मात्र त्याला वीर मरण आले. त्याच्या अनेक आठवणींनी त्याचे मित्र सध्या पार गहिवरून गेले. आनंदचा मित्र करण वानखडे, करण, सागर तायडे, शिव तेलगोटे म्हणाले, की आनंद प्रत्येक सुटीत आल्यावर प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होत असे. तसेच सैनिकी आयुष्याच्या कथा सांगत असते. आज ही बातमी ऐकून सर्वच जण नि:शब्द झालोत. अशीच भावना पंचशील नगरमधील प्रत्येकाची आहे. आनंदचा मृतदेह अकोल्यात कधी येईल, यासंदर्भात सध्या कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली नाही.
सुटीवर येण्यापूर्वीच काळाची झडप !
माना : बर्फवृष्टीमुळे रद्द झालेली सुटी, गावी जाण्याचा आनंद नियतीने हिरावल्याची घटना माना येथील जवान संजय सुरेश खंडारे यांच्याबरोबर घडली. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर हिमस्खलन झाल्याच्या घटनेत माना येथील जवान संजय सुरेश खंडारे (वय २६) हे शहीद झाले. जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले खंडारे हे देशाची सेवा करण्याच्या इराद्याने २00९ मध्ये लष्कारात दाखल झाले होते. त्यांनी २१ जानेवारीपासून सुटी मागितली होती; मात्र जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे त्यांची सुटी रद्द झाली होती. सुटीत गावी येण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. २५ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात त्यांना वीर मरण आले.