कुपोषित बेशुद्ध राहुलची मृत्यूशी झुंज
By admin | Published: September 21, 2016 03:29 AM2016-09-21T03:29:41+5:302016-09-21T03:29:41+5:30
मृत्यूशी झुंज देणाऱ्या कुपोषित राहुलवर आज संध्याकाळपासून नाशिकच्या सिव्हील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. कुंडेकर हे उपचार करीत आहेत.
हुसेन मेमन, विजय मोरे
नाशिक- मृत्यूशी झुंज देणाऱ्या कुपोषित राहुलवर आज संध्याकाळपासून नाशिकच्या सिव्हील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. कुंडेकर हे उपचार करीत आहेत. तो बेशुद्ध असून त्याला रक्त देण्यात येते आहे. चिंताजनक स्थिती असल्यामुळे तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आईने पलायन केल्याने तो सकाळी येथे दाखल होण्याऐवजी सायंकाळी दाखल झाला.
अठरा विश्व दारिद्रय, पोटाला अन्न नाही अशा स्थितीमध्ये उपचार काय करणार? नाशिकच्या रुग्णालयात बाळाला उपचारासाठी नेऊन त्याच्या सोबत थांबायचे की, रोजची रोजी रोटी कमवून उरलेल्यांचे पोट भरायचे या विवंचनेत सापडलेल्या मातेने आपला पुत्र राहुल याला मृत्यूच्या दाढेतून सोडविण्यासाठी नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यापेक्षा त्याला सोडून पळ काढणे पसंत केले. यामुळे शेवटी त्याच्या आजीचा शोध घेऊन तिच्या समवेत दोन डॉक्टर, आशा कार्यकर्ती, नर्ससह राहुलला दुपारी ४ वाजता रुग्णवाहिकेतून नाशिकला नेले. त्याच्या आईचा शोध पोलीस घेत आहेत. वास्तविक राहुलला आज सकाळीच नाशिकला न्यायचे होते परंतु त्याच्या आईने पळ काढला. व सोबत कुटुंबातील कुणी सज्ञान व्यक्ती असल्याशिवाय या कुपोषित बाळाला आम्ही नाशिकला पाठविण्याची कारवाई करू शकत नाही उद्या काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी आमच्यावर येईल असे डॉक्टरांनी सांगितले. मग त्याच्या आप्ताचा शोध घेतला असता त्याची आजी हाती लागली.तिला त्याच्या सोबत जाण्यास राजी केले गेले. त्यामुळे राहुलला उपचार मिळण्यास विलंब झाला.
एकाची काळजी करीत बसलो तर बाकिच्यांवरही तशीच वेळ येईल त्यामुळे मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करून काळजावर दगड ठेवून इतरांचे पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याला राहुलच्या मातेने महत्व दिले. नाशिकला गेलो तरी आपल्या खाण्यापिण्याचे काय? इतरांच्या भुकेचे काय? त्यामुळे तिने पळ काढला, असे समजते. यामुळेच जेव्हा अंगणवाडी कर्मचारी किरकिरे यांनी तिला दोनवेळा राहुलला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले तेव्हाही तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
>आईचा शोध सुरू
अखेर आज संध्याकाळपर्यंत राहुलच्या आईचा तपास
लागला नाही. आईचा तपास
न लागल्याने डॉक्टरांनी अखेर जव्हार पोलीस ठाण्यातील पोलिसांना बोलावून तिचा
शोध घेण्यास पोलिसांना सांगितले आहे.
जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात साध्या श्रेणीतील तीव्र बालके- १८ व अतितीव्र बालके- ३ अशी एकूण- २१ बालके दाखल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची संख्या रोज वाढते आहे.
>१२९६ पदे रिक्त कुपोषण वाढले
पालघर : ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्या अंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेची तब्बल १ हजार २९६ पदे रिक्त असून आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्या खात्यांतर्गतही अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील कुपोषण वाढीवर झाला आहे.
जव्हार येथील कुपोषणा सारखा महत्वपूर्ण प्रश्न हाताळण्या साठी आरोग्य विभागांतर्गत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी असे प्रत्येकी एक पदे रिक्त आहेत.त्याच बरोबरीने १२२ पदेही रिक्त आहेत.
पालघर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागांतर्गत ३२१ पदे रिक्त असून लेखा विभागा अंतर्गत ९ पदे, ग्रामपंचायत विभागांतर्गत एकूण ६९ पदे,कृषी विभागांतर्गत ३ पदे, बांधकाम विभागांतर्गत २५ पदे, पशुसंवर्धन विभागांतर्गत १९ पदे, शिक्षण विभागांतर्गत ७०७ पदे, एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत ९ पदे, व पाणीपुरवठा विभागांतर्गत १० पदे अशी एकूण १ हजार २९६ महत्वपूर्ण पदे पालघर जिल्हा निर्मितीला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्या नंतरही आजपर्यंत भरण्यात आलेली नसल्याने रिक्त राहिली आहेत.
हि पदे तात्काळ भरण्यात यावीत यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा,उपाध्यक्ष व सर्व सभापतींनी पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाचे उंबरठे अनेक वेळा झिजवूनही काही उपयोग झाला नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी लोकमतला सांगितले.