लग्नाच्या दिवशीच मृत्यूने गाठले!
By admin | Published: May 29, 2017 04:23 AM2017-05-29T04:23:09+5:302017-05-29T04:23:09+5:30
एकीकडे लगीनघाईची लगबग, तर दुसरीकडे स्वातीच्या अपघाताची बातमी... संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा कोसळलेला डोंगर... उपचारासाठी
अविनाश मुडेगावकर/लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई (जि. बीड) : एकीकडे लगीनघाईची लगबग, तर दुसरीकडे स्वातीच्या अपघाताची बातमी... संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा कोसळलेला डोंगर... उपचारासाठी स्वातीला रुग्णालयात दाखल केले. झुंज सुरू असताना लग्नाच्या दिवशीच मृत्यूने गाठले. बोहल्यावर चढण्याच्या दिवशी सरणावर चढण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर नियतीने आणल्याची घटना जिल्ह्यात घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील स्वाती सूर्यकांत माने (१९) हिचा विवाह तालुक्यातीलच हातोला येथील तरुणाबरोबर ठरला होता. लग्नाची तारीखही निश्चित झाली. लग्न तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने कुटुंबीय व नातेवाइकांची लग्नाची तयारी सुरू होती.
सर्व प्रकारची खरेदी, स्वातीला देण्यासाठी आणलेल्या रुखवतातील विविध वस्तू, आहेर, लग्नाचा भरलेला बस्ता, अशी संपूर्ण तयारी झाली होती. मेकअपचे सामान घेण्यासाठी स्वाती मावशीला घेऊन अंबाजोगाईला आली होती.
मावशीसोबत यशवंतराव चौकातून दुकानाकडे जाताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने तिला ३० एप्रिलला जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. शासकीय रुग्णालयातील उपचार तोकडे पडू लागल्याने तिला लातूर येथे हलविण्यात आले.
लातूर येथे तिच्यावर सलग २६ दिवस उपचार करण्यात आले. दुर्दैव म्हणजे लग्नाच्याच दिवशी २६ मे रोजी तिचा अंत झाला. ज्या गावातून तिच्या लग्नाची वरात निघणार होती, जे वऱ्हाडी लग्नासाठी जमणार होते, त्यांना तिच्या अंत्यसंस्कारास
उपस्थित राहण्याची कटू वेळ आली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
तीन आठवड्यांपूर्वी झाला अपघात
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील स्वाती सूर्यकांत मानेचा विवाह हातोला येथील तरुणाबरोबर ठरला होता. लग्न तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने कुटुंबीय व नातेवाइकांची लग्नाची तयारी सुरू होती. मावशीसोबत यशवंतराव चौकातून दुकानाकडे जाताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली.