पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तपास होणार नाही

By admin | Published: April 28, 2016 06:06 AM2016-04-28T06:06:31+5:302016-04-28T06:06:31+5:30

पानसरे यांच्या हत्येचा तपास घटनेच्या दोन-तीन वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याने, उच्च न्यायालयाने सीबीआय व विशेष तपास पथकाला चांगलेच फैलावर घेतले.

Death will be auspicious on the death anniversary, but will not be investigated | पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तपास होणार नाही

पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तपास होणार नाही

Next

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास घटनेच्या दोन-तीन वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याने, उच्च न्यायालयाने सीबीआय व विशेष तपास पथकाला चांगलेच फैलावर घेतले. या दोन्ही व्यक्तींच्या पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील. मात्र, तपास काही पूर्ण होणार नाही. तपासयंत्रणा आणखी किती काळ न्यायालयात तपास अहवाल सादर करणार? असा टोलाही उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना लगावला.
डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाने करावा व यावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण राहावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे, तसेच केतन तिरोडकर यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.
बुधवारच्या सुनावणीत सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्यासाठी मुदत मागितली, तर पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीतर्फे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी तपास फारसा पुढे सरकला नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.
त्यावर खंडपीठाने या प्रकरणांचा तपास केव्हा पूर्ण करणार? अशी विचारणा सीबीआय व एसआयटीकडे केली. ‘दाभोलकरांची हत्या २०१३ मध्ये, तर पानसरे यांची हत्या २०१४ मध्ये झाली. घटनांना दोन-तीन वर्षे उलटून गेली, तरीही तपासयंत्रणांच्या हाती काहीच लागले नाही? त्यांच्या पुण्यतिथ्यांवर पुण्यतिथ्या साजऱ्या होतील, पण तुमचा तपास
काही संपणार नाही. मात्र, आम्ही हे चालू देणार नाही. तुम्ही दाखल केलेल्या अहवालांवरून आतापर्यंत तुमच्या हाती काहीच लागल नाही, असे दिसतेय,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआय व एसआयटीला फटकारले.
एसआयटीतर्फे अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमधून पुंगळ्या व शस्त्रांचा अहवाल यायचा असल्याने तपास केव्हा पूर्ण करण्यात येईल, याची मुदत सांगू शकत नसल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘दाभोलकर, पानसरे आणि कर्नाटकमधील कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीने व एकाच शस्त्राने करण्यात आल्याचा संशय तपासयंत्रणांना आहे. त्यामुळे पानसरे हत्याप्रकरणातील मुद्देमाल सीबीआयला सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीकरिता पाठवण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यांचा अहवाल अद्याप आला नसल्याने पानसरे प्रकरणाचा तपास पुढे जात नाही आणि तो केव्हा पूर्ण करण्यात येईल, हेही ठोस सांगता येऊ शकत नाही,’ असे अ‍ॅड. शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले.
‘तपास योग्य पद्धतीने आणि त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप असू नये, असे आम्हाला वाटते. मात्र, आता अशी वेळ आली आहे की, यामध्ये जनहित याचिका, कुटुंबीय आणि त्यात कहर म्हणजे आरोपीही (समीर गायकवाड) मध्यस्थी अर्ज करतो. आम्ही कुुटुंबीयांची (पानसरे आणि दाभोलकर) व्यथा समजतो. त्यांना तपास पूर्ण होईल की नाही, याबद्दल शंका आहे. मात्र, त्यांचा न्यायव्यस्थेवर विश्वास हवा,’ असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)
>समीर गायकवाडच्या खटल्याला स्थगिती नाही
१पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याच्यावर एसआयटीचा तपास सुरू असेपर्यंत, आरोप निश्चित न करण्याची सूचना उच्च न्यायालयाने २९ फेब्रुवारीच्या सुनावणीत कोल्हापूर सत्र न्यायालयाला केली होती. त्यामुळे अद्याप समीर गायकवाडवर आरोप निश्चित करण्यात आले नाहीत. या प्रकरणी समीर गायकवाड याने उच्च न्यायालयात पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेत मध्यस्थी केली.
२खटल्याला स्थगिती देऊ नये, अशी मागणी गायकवाड याने केली आहे. त्यावर खंडपीठाने त्याचा अर्ज निकाली काढत सत्र न्यायालयाला सीआरपीसीप्रमाणे खटल्याची प्रकिया सुरू ठेवावी, असे निर्देश दिले. खटल्याला स्थगिती देणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालय २९ एप्रिल रोजी गायकवाड याच्यावर आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.

Web Title: Death will be auspicious on the death anniversary, but will not be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.