युवक-युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम
By admin | Published: April 5, 2017 01:26 AM2017-04-05T01:26:10+5:302017-04-05T01:26:10+5:30
लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन युवक व युवती यांचा खून हा डोक्यात गंभीर मार लागल्याने झाला
लोणावळा : लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन युवक व युवती यांचा खून हा डोक्यात गंभीर मार लागल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली. या अहवालानुसार सदर मयत मुलीसोबत कसलाही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
आयएनएस शिवाजी ते एअर फोर्स दरम्यानच्या एस पॉइंट या ठिकाणी सिंहगड महाविद्यालयातील मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा सार्थक दिलीप वाकचौरे (वय २२, रा. चणेगाव रोड, सात्रळ, राहुरी सोनगाव, जिल्हा अहमदनगर) व सिंहगड विद्यालयातच संगणकीय इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी श्रुती संजय डुंबरे (वय २१, रा. गेस्ट हाऊस ओतुरजवळ, ता. जुन्नर, जि. पुणे) या युवक व युवतीचा मृतदेह आढळला होता. आज सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात मयत श्रुती व सार्थक यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. यामध्ये दोघांचाही मृत्यू हा डोक्यात गंभीर मार लागला असल्याने झाला असल्याचे समोर आले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक राजकुमार शिंदे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी घटनास्थळी काही मागोवा मिळतो का याची
पडताळणी केली. श्वानपथक, फिंगर प्रिंट पथकाच्या साहाय्याने परिसर पिंजून काढला. तसेच आठ वेगवेगळी पथके तयार करून घटनेचा तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)
सार्थक हा मनमिळाऊ, तर श्रुती ही टॉपर विद्यार्थिनी
सार्थक वाकचौरे हा सिंहगड महाविद्यालयातील हरहुन्नरी विद्यार्थी होता. महाविद्यालयात कोणताही कार्यक्रम असला, तर सार्थक हा आघाडीवर असायचा, असे सार्थकचा रूममेट आशिष दाभाडे याने लोकमतशी बोलताना सांगितले. श्रुती ही टॉपर विद्यार्थिनी होती. मागील तीन ते चार वर्षांपासून ते दोघे चांगले मित्र होते व दोघेही मनमिळाऊ होते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.