‘लॉ’ प्रवेशाचा बोजवारा; प्रवेशप्रणालीत गोंधळ, चौथी यादी नव्याने जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 04:31 AM2016-10-17T04:31:32+5:302016-10-17T04:31:32+5:30
आॅक्टोबर महिना उजाडूनही लॉ प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, गोंधळच वाढत चालला आहे.
मुंबई : आॅक्टोबर महिना उजाडूनही लॉ प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, गोंधळच वाढत चालला आहे. प्रवेशप्रक्रिया प्रणालीत बिघाड झाल्यामुळे, नव्याने पुन्हा चौथी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाव लागलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
जून-जुलै दरम्यान लॉ प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते, पण आॅक्टोबरचा तिसरा आठवडा उजाडला, तरी यंदाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. लॉ प्रवेशाच्या तीन गुणवत्ता यादी आतापर्यंत जाहीर झाल्या असून, यात हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अशी तक्रार विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला मेल करून केली. या तक्रारीची दखल घेत, सीईटी प्रशासनाने कार्यवाही केली असता, सर्व्हरमध्ये गोंधळ झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सीईटी सेलकडून चौथी यादी रद्द करून, नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, प्रवेश प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये आटोपली नाही, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय? प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना नाहक होत असून, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देत, तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
>मायनॉरिटी कोट्याविषयीची माहिती काही महाविद्यालयांनी सीईटी सेलकडे दिली नाही. त्यामुळे आॅनलाइन प्रवेश देताना, नॉन मायनॉरिटी विद्यार्थ्यांना मायनॉरिटी कोट्यात प्रवेश दिला गेला. ही चूक महाविद्यालय प्रशासनांची आहे. परिणामी, सीईटी सेलने पुन्हा चौथी यादी जाहीर केली आहे.
- चंद्रशेखर ओक, आयुक्त, सीईटी सेल