शिवसेना प्रवेशाची चर्चा निराधार; काँग्रेसमध्येच राहणार : कोळंबकर
By admin | Published: June 27, 2016 01:53 AM2016-06-27T01:53:40+5:302016-06-27T01:53:40+5:30
‘मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियातून फिरणारे मेसेज खोडसाळपणाचा प्रकार आहे.
मुंबई : ‘मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियातून फिरणारे मेसेज खोडसाळपणाचा प्रकार आहे. मी पक्षात समाधानी असून, काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी स्पष्ट केले.
मूळचे शिवसैनिक असणाऱ्या कोळंबकर यांनी नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेसमर्थक मानले जाणारे कोळंबकर यांनी वडाळा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय नोंदविला आहे. कोळंबकर शिवसेनेच्या संपर्कात असून, लवकरच आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू आहे. मात्र, पक्षांतराच्या बातम्या निराधार आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी मुद्दाम असे मेसेज पसरविण्यात येत आहेत. शिवसेना सोडली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्या पक्षांतरामागे काही कारणे होती. स्वत:च्या फायद्यासाठी ऊठसूट पक्ष बदलणे माझ्या तत्त्वात बसत नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीच्या बळावर मला पक्षात योग्य तो मानसन्मान मिळत आहे. माझ्या कामाची आाणि कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जात आहे, त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कोळंबकर यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू आहे. नवीन वॉर्ड अध्यक्षांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यास, महापालिका निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल. आतापर्यंत अनेकदा इतर पक्षांकडून निमंत्रणे आली. मात्र, त्यात स्वारस्य नाही. मी आणि माझ्या विभागातील कार्यकर्ते पक्षांतच करण्याची सुतराम शक्यता नाही. आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कोळंबकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)