मंदा म्हात्रे व तुकाराम मुंढे यांच्यात पुन्हा वाद
By admin | Published: August 23, 2016 02:29 AM2016-08-23T02:29:32+5:302016-08-23T02:29:32+5:30
बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली.
नवी मुंबई : बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. दुसऱ्या भेटीतही आयुक्तांनी सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव मंडळांना कमानी बांधण्याची परवानगी दिली जावी, पाणीपुरवठा संदर्भातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या तसेच धूळखात पडलेले पालिकेचे रुग्णालयही लवकरात लवकर सुरु करण्यात या तीन प्रमुख मागण्यांसाठी आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
लोकप्रतिनिधींना महापालिका आयुक्तांनी सन्मानपूर्वक वागणूक देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया म्हात्रे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस उरले असताना गणेश मंडळांना कमानी बांधण्याची परवानगी दिली जावी, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वच विभागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईकरांना मुबलक व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. महापालिकेचे रुग्णालय बांधून तयार आहेत मात्र अजूनही आरोग्याच्या सेवा पुरविल्या जात नाही. या इमारती धूळ खात पडल्या आहेत असेही म्हात्रे यांनी सांगितले. बेलापूर रुग्णालयाकरिता आमदार निधी तर वाशीतील रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून आयुक्तांकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याची तक्रार अधिकारी वर्गाने केल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितली. सफाई कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही कंत्राटदाराला महापालिकेकडून वेळीच मोबदला न मिळाल्याने कामगारांचीही फरफट होत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
महापालिकेच्या ईटीसी केंद्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी म्हात्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)
>मंदा म्हात्रेंना आयुक्तांनी खोटे ठरविले
महापालिका आयुक्तांना ईटीसी केंद्राच्या चौकशीची मागणी करत असताना केंद्राला अद्यापही महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. ईटीसी केंद्राच्या एका भागात अनधिकृतपणे पत्र्याची शेड उभारण्यात आले आहेत, खाजगी संस्थांना काही खोल्या वापरण्यासाठी देण्यात आल्या, अनावश्यक विजेचा वापर आदी बाबी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या. यावेळी तुम्ही दिलेली माहिती ही खरी कशी असे म्हणत आयुक्त मुंढे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना खोटे ठरवले. कायद्यानुसार सीएसआरवरील संचालिका अतिरिक्त आयुक्त नाहीत, शहरात नागरी सुविधांची काय कामे केली, जोपर्यंत ईटीसी केंद्राची चौकशी केली जात नाही तोपर्यंत पदावरील व्यक्तींना निलंबित करा.
>ईटीसीची चौकशी झालीच पाहिजे
महापालिकेच्या ईटीसी केंद्राची चौकशी करण्याबाबतची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. अपंग केंद्रात महापालिका क्षेत्रातील किती विद्यार्थी आहेत, सीएसआरच्या प्रमुख पद निर्माण नसतानाही त्यांची नियुक्ती कोणत्या आधारे करण्यात आली, बजेटमध्ये जाहिरात आणि पाहुणे यांच्यासाठी खर्चाबाबतची माहिती देण्यात यावी अशा मागण्याही म्हात्रे यांनी केल्या.