शिवरायांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावरून वाद
By admin | Published: April 7, 2017 06:09 AM2017-04-07T06:09:33+5:302017-04-07T06:09:33+5:30
शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
मुंबई : शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने विविध ढोल पथकांना गडावर १ हजार ढोलांची सलामी देण्याचे आवाहन केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, असा कोणताही कार्यक्रम मंडळाने आयोजित केला नसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
कदम म्हणाले की, गेल्या १२२ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर परंपरेने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यंदा मंडळाने रायगडावर १० व ११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदीया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याशिवाय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालक मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह स्थानिक महापौर, उपमहापौर आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील. या वेळी पालखी मिरवणूक, मराठा रेजिमेंट बँडचे वादन व रायगड जिल्हा पोलिसांतर्फे बंदुकीच्या २१ फैरी झाडून व बँडचे वादन करून मानवंदना दिली जाईल. मात्र ढोल बडवण्याचा कोणताही कार्यक्रम या वेळी होणार नसल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये अद्वैत चव्हाण नामक व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊन नाव नोंदणीचे आवाहन केले आहे. ढोल वाजवण्याचे आवाहन करणाऱ्या या पोस्टचा सोशल मीडियावर समाचार घेण्यात आला आहे. कार्यक्रमाला विरोध करत दुर्ग संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या शिवप्रेमींच्या संस्थेने निषेध व्यक्त करत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तर, असा कार्यक्रम होणार नसल्याचे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)