भूसंपादन कायद्यासाठीचा हटवाद टाळता आला असता - उद्धव ठाकरे
By admin | Published: September 1, 2015 10:27 AM2015-09-01T10:27:18+5:302015-09-01T11:14:37+5:30
भूसंपादन विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घरचा आहेर दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - वादग्रस्त भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी या विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर चिमटा काढला आहे.
मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकावर त्यांची मतं मांडलीत. भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे देशातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा विजय आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या विधेयकातील काही मुद्दे शेतकरीविरोधी होते, लोकभावनांचा आदर करुन काम करते ते सरकार ख-या अर्थाने कल्याणकारी असते. मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे जनमत बनले व ही भीती खोडून काढण्यात सरकारी यंत्रणाही तोकडी पडले असे त्यांनी म्हटले आहे. याचा फटका बिहार विधानसभेतही बसला असता याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. शेतक-यांना आधार द्या, त्यांच्या आत्महत्या रोखा, त्यांच्या चुली पेटवा, चा-या अभावी तडफडणा-या जनावरांना वाचवा व सत्ता त्यासाठीच राबवा हीच आमच्या 'मन की बात' आहे असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.