कविवर्य शंकर बडे यांचे देहावसान

By admin | Published: September 1, 2016 08:03 PM2016-09-01T20:03:48+5:302016-09-01T20:03:48+5:30

कविवर्य शंकर गणपत बडे उपाख्य बाबा यांचे गुरुवारी पहाटे मेंदूतील रक्तस्रावाने यवतमाळात निधन झाले.

Debate of poet Shankar Bade | कविवर्य शंकर बडे यांचे देहावसान

कविवर्य शंकर बडे यांचे देहावसान

Next

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 1 - प्रतिमा आणि प्रतिकांचे नाते घट्ट करणारा अस्सल वऱ्हाडी साहित्याचा मुगूट मनी आणि आर्णी येथील ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य शंकर गणपत बडे उपाख्य बाबा यांचे गुरुवारी पहाटे मेंदूतील रक्तस्रावाने यवतमाळात निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता येताच विदर्भातील साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली.
पावसानं इचीबहीन कहरच केला नं नागो बुढा काल वाहूनच गेला या कवितेने वऱ्हाडी साहित्यात लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या शंकर बडे यांचा जन्म ३ मार्च १९४७ रोजी दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे झाला होता. भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजनी आॅर्केस्ट्रात त्यांनी निवेदक म्हणून काम केले.

हास्याची कारंजी फुलविताना भावनांची तरलता आणि कारुण्य डोहात बुडवून काढणारा कवी म्हणजे शंकर बडे होय. वऱ्हाडच्या ग्रामीण जीवनातील अस्सल अनुभव त्यांनी आपल्या ह्यबॅरिस्टर गुलब्याह्ण या एकपात्री प्रयोगातून साकारले. महाराष्ट्रात त्याचे तीनशेवर प्रयोग झाले. अस्सा वऱ्हाडी माणूसह्ण ही त्यांची एक दर्जेदार काव्यकलाकृती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीन हजारावर प्रयोग झाले. आकाशवाणी, दूरदर्शन आणि वृत्तपत्र, दिवाळी अंकातून त्यांनी विस्तृत लेखन केले.

शंकर बडे यांच्या मागे पत्नी कौसल्याबाई, भारती सानप, नीता पालवे, कीर्ती सांगळे या तीन कन्या आणि शिक्षक गजानन बडे हा मुलगा आहे. त्यांच्या पेशवे प्लॉट स्थित निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी येथील पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिवाकर पांडे होते. यावेळी वऱ्हाडी साहित्यिक बाबाराव मुसळे, डॉ. मिर्झा रफी अहेमद बेग, जयंत चावरे, सुरेश कैपिल्येवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. संचालन प्राचार्य शंकरराव सांगळे व सुरेश गांजरे यांनी केले.

बडे यांचे साहित्य
वऱ्हाडी बोलीला साहित्याच्या कोंदणात बसविणाऱ्या शंकर बडे यांनी वऱ्हाडीत विपूल लेखन केले. इरवा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९७७ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर मुगूट आणि सगुन हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचे धुपाधुपी हे पुस्तक छापून तयार असून त्याचा लवकरच प्रकाशन समारंभ होणार होता. लोकमतमध्ये झोके आठोनीचे आणि अब्बक दुब्बक या सदराखाली त्यांनी वऱ्हाडी लेखन केले. मुंबई दूरदर्शन, ई टीव्ही मराठी, नागपूर, यवतमाळ आकाशवाणीवरुन बॅरिस्टर गुलब्याचे १२ भाग प्रसारित झाले.
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार
शंकर बडे यांना गोरेगावच्या लोकमित्र सरदार प्रतिष्ठानच्या ह्यलोकमित्रह्ण पुरस्कार, यवतमाळच्या कलावैदर्भीचा कलायात्री पुरस्कार, लोकमतचा त्री-दशकपूर्ती सन्मान, लीलानाथ प्रतिष्ठानचा कृतार्थ पुरस्कार, २००४ मध्ये मेटीखेडा (यवतमाळ) येथील दुसऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मजूर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये आर्णी येथे झालेल्या ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या मतदार जागृती अभियानाचे ते ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडरही होते.

शोकसंवेदना
विदर्भातील ग्रामीण जनतेच्या सुखदु:खांना शैलीदार वाचा देणारा लोकप्रिय कवी ही यवतमाळच्या शंकर बडे या लोककवीची ओळख आहे. सारे आयुष्य लोकशैलीतील कवितेच्या सेवेत घालवलेल्या शंकरचा माझ्याशी व लोकमत परिवाराशी दीर्घकाळचा संबंध राहिला. विदर्भ साहित्य संघाने आर्णी येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळचे त्यांचे भाषण ग्रामीण क्षेत्रातील सर्वच लेखक व कवींना प्रोत्साहन देणारे व नवी दृष्टी देणारे होते. बडे यांची कविता प्रकृतीने विनोदी होती व ती सामान्य माणसांच्या आयुष्यातील प्रतिमांना उजाळा देणारी आणि अनेकांच्या मनात त्यांच्या भूतकाळातील अतिशय हळूवार आठवणी जागे करणारी होती. त्यांच्या जाण्याने विदर्भाचे व त्याच्या ग्रामीण क्षेत्रातील साहित्यविश्वाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
- विजय दर्डा
चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड

कवितेची मातीशी नाळ तुटली - संजय राठोड
वऱ्हाडच्या मातीशी कवितेचं नाते घट्ट करणारे वऱ्हाडी कवी शंकर बडे यांच्या निधनाने कवितेची मातीशी असलेली नाळ तुटली, अशा शब्दात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. गुरुवारी दुपारी बडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व शासनाच्यावतीने श्रद्धांजली वाहिली. साहित्य क्षेत्राची झालेली ही अपरिमीत हानी कधीही भरुन निघणार नाही, अशी संवेदना त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांच्या शोकसंवेदना
कवी शंकर बडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्यातील साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून संवेदना कळविल्या. कवी फ.मु.शिंदे, रामदास फुटाणे, डॉ. सतीश तराळ, कवयत्री मीरा ठाकरे आदींनी बडे परिवारांचे सांत्वन केले.

Web Title: Debate of poet Shankar Bade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.