सीबीआयकडून युक्तिवादाला सुरुवात
By admin | Published: June 23, 2017 03:47 AM2017-06-23T03:47:20+5:302017-06-23T03:47:20+5:30
१९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत सीबीआयने गुरुवारी युक्तिवादाला सुरुवात केली. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या वकिलांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करणार असल्याचे विशेष टाडा न्यायालयाला सांगितले होते.
गेल्या शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, करीमुल्ला खान, रियाझ सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट यांना दोषी ठरवले. या पाच जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत विशेष सीबीआय वकील दीपक साळवी यांनी युक्तिवादास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या अनेक प्रकरणांचा हवाला साळवी यांनी विशेष न्यायालयाला दिला.
दोनच दिवसांपूर्वी युक्तिवादाला सुरुवात करण्याआधी साळवी यांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करू, असे विशेष न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने सालेम, मुस्तफा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान व फिरोज खान यांना आयपीसी, टाडा, शस्त्रास्त्रे कायदा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी व बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या सर्व कायद्यांतील कलमांतर्गत या सर्व दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मात्र सालेमच्या प्रत्यार्पणावेळी भारत व पोर्तुगालमध्ये झालेल्या करारानुसार त्याला फाशीची शिक्षा ठोठावता येऊ शकत नाही. त्यामुळे सालेमला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. तर सहावा आरोपी रियाझ सिद्दिकी याला केवळ टाडाअंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यालाही जन्मठेपच होऊ शकते. सातवा आरोपी अब्दुल कय्युम याची सुटका न्यायालयाने केली आहे.