वादातून विद्यार्थ्याला भोकसले
By Admin | Published: March 1, 2017 02:46 AM2017-03-01T02:46:30+5:302017-03-01T02:46:30+5:30
डोक्यात टपली मारल्याच्या संशयावरून महाविद्यालयीन तरुणाने त्याच्याच वर्गमित्राला भोकसल्याचा प्रकार घडला
नवी मुंबई : डोक्यात टपली मारल्याच्या संशयावरून महाविद्यालयीन तरुणाने त्याच्याच वर्गमित्राला भोकसल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, जखमीवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपरखैरणे सेक्टर ५ येथील स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.
किशन विश्वकर्मा (१९) असे अटक केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो दिघा येथील यादवनगरचा राहणारा आहे. त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कोपरखैरणे सेक्टर ५ येथील स्वामी विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे. शनिवारी दुपारी किशन याला त्याच्याच काही वर्गमित्रांनी डोक्यात टपली मारली. या वेळी अतुल बांदल यानेच त्याला टपली मारल्याचा त्याला संशय आला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले असता, किशन याने स्वत:कडील चाकूने अतुलच्या पोटावर, तसेच गालावर घाव केले. दरम्यान अतुलवर हल्ला करण्यासाठी त्याने यादवनगरमधील इतर साथीदारही कॉलेजच्या बाहेर बोलावले होते, असेही समजते. या हल्ल्यात अतुल बांदल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अतुलचे कुटुंबीय चिंतित आहे. हा संपूर्ण प्रकार कॉलेजमध्ये घडला असून त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारात अतुल हा गंभीर जखमी असल्याने त्याचे कुटुंबीय चिंतित आहे. पतीच्या निधनानंतर सुरक्षारक्षकाची नोकरी करून अतुलची आई मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे. अशातच घडलेल्या या प्रकारामुळे त्यांच्यापुढे नवे संकट उभे राहिले आहे. शिवाय या प्रकारावरून महाविद्यालयीन विद्यार्थी शस्त्र घेऊन कॉलेजमध्ये येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हा प्रकार कॉलेजच्या बाहेर घडल्याचे कॉलेज व्यवस्थापनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)
>हल्ल्यात अतुल बांदल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.