डेब्रिज माफियांना अभय
By admin | Published: June 7, 2017 02:50 AM2017-06-07T02:50:57+5:302017-06-07T02:50:57+5:30
अडवली - भुतावलीमधील डेब्रिजच्या भराव प्रकरणी ठाणे तहसीलदारांनी मयूरेश सिम्पोनी या जमीन मालक कंपनीला मार्चमध्ये कारवाईची नोटीस दिली
नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अडवली - भुतावलीमधील डेब्रिजच्या भराव प्रकरणी ठाणे तहसीलदारांनी मयूरेश सिम्पोनी या जमीन मालक कंपनीला मार्चमध्ये कारवाईची नोटीस दिली आहे. ५३,९४५ ब्रास मातीचा भराव केल्याचा ठपका ठेवला असून संबंधितांकडून खुलासा मागविला आहे. वास्तविक भरावाचा आकडा अत्यंत कमी दाखविला जात असून मागील तीन वर्षांपासून फक्त नोटीस दिली जात असून प्रत्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील अडवली-भुतावली गावच्या परिसरामध्ये मयूरेश सिम्पोनी कंपनीच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड तयार करण्यात आले आहे. रोज एक ते दीड हजार डंपरमधून बांधकामाचा कचरा व इतर डेब्रिज येथील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आले आहे. या जमिनीवरील नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजविण्यात आले आहेत. वृक्ष तोडण्यात आले असून शेकडो वृक्ष डेब्रिजच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्येही अतिक्रमण करण्यात आले आहे. डेब्रिज टाकणारे माफिया पूर्वी मयूरेश कंपनीच्या जागेवरच भराव करत होते. परंतु नंतर शेजारील अमोल नाईक व इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरवात झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाण्यास मज्जाव केला जावू लागला. शेतघर पाडण्यात आले. शेतकऱ्यांवर डंपर चालवून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. ‘लोकमत’ने याविषयी आवाज उठविल्यानंतर सरकारी यंत्रणा काही प्रमाणात जागी झाली आहे. २२ मार्चला मयूरेश कंपनीला कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे. २० सर्वे क्रमांकावर पूर्वी ४६,३७८ ब्रास मातीचा भराव केला होता. यामध्ये ७,५६७ ब्रासची भर पडली असून सद्यस्थितीमध्ये ५३,९४५ ब्रास मातीचा भराव तेथे आहे. हा भराव टाकण्यासाठी परवानगी घेतली होती का याचा खुलासा करण्यात यावा. योग्य खुलासा केला नाही तर दंडनीय रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
अडवली - भुतावली परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. अनधिकृतपणे डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड तयार करून तेथे मोठ्या प्रमाणात भराव केला आहे. या प्रकरणी त्रस्त शेतकऱ्यांनी २०१४ पासून सातत्याने तक्रारी केल्या आहेत. परंतु या प्रकरणी अद्याप एकदाही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तीन वर्षे फक्त नोटीस पाठविण्यात येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी संबंधितांकडून शासनाकडे स्वामीत्वधनाची रक्कम भरली आहे का, पैसे भरले असल्यास त्या रकमेचे चलन, गौणखनिज वाहतूक परवान्याचे पुरावे तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भरावाचा आकडा संशयास्पद : ठाणे तहसीलदारांनी मयूरेश कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये २०१५ पर्यंत ४६,३७८ ब्रास भराव टाकला होता. पुढील दोन वर्षांमध्ये दिवस-रात्र भराव केल्यानंतरही ७,५६७ ब्रासच भराव टाकल्याचा उल्लेख केला आहे. हा आकडा संशयास्पद असून डेब्रिज माफियांना पाठीशी घालण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकरी अमोल नाईक यांनी केला आहे.
प्रत्यक्ष कारवाई कधी?: अडवली-भुतावली प्रकरणी ठाणे तहसीलदार कार्यालयाकडून डेब्रिज माफियांना अभय दिले जात आहे. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही माफियांवर एकदाही कारवाई केलेली नाही. फक्त नोटीस देवून काय साध्य करण्यात आले. नोटीस दिल्यानंतरही भराव सुरू कसा राहिला याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.
>कोट्यवधीचे नुकसान
ठाणे तहसीलदारांनी मयूरेश कंपनीला फेब्रुवारी २०१५ मध्ये अनधिकृत भरावप्रकरणी ६ कोटी ४९ लाख रुपये भरण्याची नोटीस दिली होती. ४६,३७८ ब्रास भराव केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, स्वामीत्वधनाची ९२ लाख ७५ हजार व दंडाची ५ कोटी ५६ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये काहीही कारवाई केलेली नाही. २२ मार्च २०१७ ला पुन्हा नोटीस दिली आहे. यामध्ये ५३,९४५ ब्रास भराव टाकण्याचा ठपका ठेवला असून करोडो रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे.