कर्जमाफी : भाजपाची फिल्डिंग, रात्री उशिरा घेतली काँग्रेस नेत्यांची भेट
By Admin | Published: June 24, 2017 05:30 AM2017-06-24T05:30:25+5:302017-06-24T07:03:27+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची समस्या सोडविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. अशी मागणी कांग्रेसनं भाजपाकडे केली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीरा भाजपा आणि काँग्रस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा आदेश राज्यातील भाजपा नेत्यांना दिला आहे. त्यामुळे भाजपा नेते सतत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे. शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेबरोबरच राष्टपती पदाच्या मतासाठीही प्रयत्न सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली यावेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नसीम खान उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेस पक्षा तर्फे शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांचे निवेदन भाजपा नेत्यांना दिले.
10 हजार रूपये मदत देण्याच्या जीआर मधील जाचक अटी रद्द कराव्यात,आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटुबांचे पुर्नवसन करावे. शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के भाव देण्याबाबत ठोस कारवाई करावी. अंदोलनादरम्यान झालेले शेतक-यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, असेही ते म्हणाले. नियमीत कर्ज फेडणा-यांना वेगळं पॅकेज द्यावे. कर्जमाफी संदर्भात सरकारने तात्काळ मंत्रीमंडळ बैठक घेऊन निर्णय घ्यावा आणि त्याचा जीआर काढावा. सरकारने राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना केली मात्र दोन वर्ष त्याला अध्यक्ष नसल्याने आत्महत्या वाढल्याचेही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री - शरद पवार यांची दिल्लीत भेट
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रामनाथ कोविंद यांना मदत करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्यात बंद खोलीत कोविंद यांना राष्ट्रवादीची मते मिळावीत यासाठी चर्चा झाल्याचे कळते. राष्ट्रपती-पदाच्या निवडणुकीत व्हिप काढला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मते कोविंद यांच्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोत
कोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. २00८ मध्ये झालेली कर्जमाफी आणि आताच्या कर्जमाफीच्या निर्णयात खूप फरक आहे. त्यावेळची पाच एकराच्या आतील ३६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९00 कोटीची कर्जमाफी दिली होती. आता जवळपास त्यात तिप्पट वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही या योजनेत सामावून घेतले आहे.