पारसिक बोगद्याजवळील दरड हटवली, रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू
By Admin | Published: June 21, 2016 05:17 PM2016-06-21T17:17:59+5:302016-06-21T17:31:19+5:30
उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेला मेगाब्लॉक आता संपला असून बोगद्याजवळील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले.
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २१ - उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेला मेगाब्लॉक आता संपला असून बोगद्याजवळील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले असून मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू झाली आहे. मंगळवार सकाळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचा बो-या वाजलेला असतानाच दुपारच्या सुमारास पारसिक बोगद्याजवळील रक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे स्थानकातील फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवर तासाभराचा ब्लॉक घेऊन ही दरड हटवण्याचे काम सुरू झाले. मात्र हे काम पूर्ण होण्यास दोन तासांहून अधिक अवधी लागला असून ५ च्या सुमारास अखेर ही दरड पूर्णपणे हटवण्यात आली. हे काम पूर्ण झाले असून मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरील अप व डाऊन मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असली तरी फास्ट लोकलची वाहतूक अद्याप धिम्या गतीनेच सुरू आहे.
यामुळे ऑफीसमधून घरी परतणा-या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसणार असून सकाळप्रमाणेच संध्याकाळीही गाड्यांना मोठी गर्दी असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.