कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही- उद्धव ठाकरे

By admin | Published: June 25, 2017 02:26 PM2017-06-25T14:26:40+5:302017-06-25T14:26:40+5:30

शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं

Debt decision is not satisfactory - Uddhav Thackeray | कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही- उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही- उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 - शेतक-यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय हा समाधानकारक नाही. शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकमधल्या संवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले, शेतक-यांचे 2017पर्यंतचे कर्ज माफ व्हायला हवे, कर्जमाफीचा शेतक-यांना काहीही लाभ झालेला नाही, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी शिवसेनेच्या रेट्यामुळेच मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपालाही लक्ष्य केलं आहे. शेतमालाच्या हमीभावासाठी पाठपुरावा करणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असला तरी समाधानकारक नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

कर्जमाफीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणा-या शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत केले होते. सत्तेत राहून विरोध कसला करता ? असा प्रश्न आम्हाला विचारण्यात येत होता. पण सत्तेत राहून काय करता येते हे आम्ही दाखवून दिले, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या आग्रहामुळे दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने जाहीर केली, असंही रावतेंनी सांगितलं होतं. सरकारच्या घोषणेमुळे सर्वसामान्य शेतक-याला फायदा होणार असून सातबारा कोरा होणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Web Title: Debt decision is not satisfactory - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.