३० लाख शेतकऱ्यांना केले कर्जमुक्त - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:55 AM2020-08-16T03:55:06+5:302020-08-16T06:36:17+5:30
म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. मागील दहा वर्षांत झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी या वर्षी शासनाने केलेली आहे. किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगारसुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत, आपल्यासाठी ते स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता समर्पित भावनेने ही मंडळी सेवा देत आहेत. कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलीस अधिकारी व कर्मचारीही कोरोनाला बळी पडले, असे सांगून त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर शासनाने त्वरेने पावले उचलली. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचेसुद्धा टास्क फोर्स तयार केले, असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्याला शाळा सुरू करता आल्या नाहीत, पण आपण राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. आॅनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात आजघडीला अंदाजे ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. १६ लाखांहून अधिक कामगार, कर्मचारी कामावर परतले आहेत. स्थानिकांना, मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून शासनाने ‘महा जॉब्ज’ पोर्टल सुरू केले. मोबाइल अॅपही सुरू झाले आहे. जवान, किसान आणि कामगारांना एकत्र घेऊन आपण स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मनोगतानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी रश्मी ठाकरे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच विविध विभागांचे अपर मुख्य सचिव यांच्यासह कोरोनावर मात केलेले कोरोना योद्धे उपस्थित होते.