आधी कर्जमाफी, मगच चर्चा
By admin | Published: July 15, 2015 12:22 AM2015-07-15T00:22:06+5:302015-07-15T00:22:06+5:30
संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या
मुंबई : संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे तीनदा सभागृह तहकूब करावे लागले.
सभागृहाच्या नियमित कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. पावसाअभावी एकीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देता येणार नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट आत्महत्या करण्याची परवानगीच प्रशासनाकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रीतसर आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्यामुळे ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
तर, राज्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच यवतमाळ जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी आधीच कर्जमाफी देणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सभागृहातील चर्चेला काहीच अर्थ उरला नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन आपली घोषणा मागे घ्यावी. त्यानंतच सभागृहात चर्चा करू. कोरडी चर्चा आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सुरुवातीला १० मिनिटांसाठी तर नंतर अनुक्रमे ४० व १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असला तरी आजच्या कामकाज पत्रिकेत नियम २६० अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा आहे. त्यामुळे तांत्रिक कारणावरून विरोधकांनी नियम २८९ अन्वये मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
दत्त यांना सभापतींची तंबी
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधान परिषदेत घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकी झडल्या. या गदारोळात काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी सभापतींची परवानगी न घेताच जोरजोरात बोलायला सुरुवात केली. सभापतींनी तटकरेंना बोलण्याची सूचना केल्यावरही दत्त थांबण्यास तयार नव्हते. त्यामुळे सभापती निंबाळकर यांनी दत्त यांना फटकारले.