कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण , बघू आता कधी जेवायला मिळतंय : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 03:48 PM2017-09-24T15:48:35+5:302017-09-24T15:48:54+5:30
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य करताना, 'आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही' असं प्रत्युत्तर दिलं.
अहमदनगर: शेतक-यांना कर्जमाफी जाहीर करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न मिळालेली मदत यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सराकरला फटाकरलं. संपूर्ण कर्जमाफीमधला संपूर्ण शब्दच आता गेलाय, कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे, त्यामुळे बघू आता कधी जेवायला मिळतंय ते अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सराकरवर चौफेर फटकेबाजी केली.
अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शिवसेनेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सत्तेत राहून शिवसेनेने महागाईविरोधात आंदोलनाची भूमिका घेणं बरं नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय बुलेट ट्रेनबाबत बोलताना त्यांनी बुलेट ट्रेन हा महाराष्ट्रावर बोजा आहे, बुलेट ट्रेनचा जास्त लाभ गुजरातलाच होणार असल्याचं म्हटलं.
भाजपा सरकारला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असल्याच्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य करताना आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर दिलं.