कर्जमाफी तर सुरुवात कर्जमुक्ती हेच खरे उद्दिष्ट- देवेंद्र फडणवीस

By admin | Published: July 3, 2017 10:23 PM2017-07-03T22:23:14+5:302017-07-03T22:23:14+5:30

महाराष्ट्र शासन शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारे शेतकऱ्यांचे सरकार आहे

Debt relief is the only real goal - Debendra Phadnavis | कर्जमाफी तर सुरुवात कर्जमुक्ती हेच खरे उद्दिष्ट- देवेंद्र फडणवीस

कर्जमाफी तर सुरुवात कर्जमुक्ती हेच खरे उद्दिष्ट- देवेंद्र फडणवीस

Next

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर दि. 3 -  महाराष्ट्र शासन शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारे शेतकऱ्यांचे सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे, गरीबांचे कल्याण हेच सरकारचे अंतिम ध्येय आहे. कर्जमाफी ही तर सुरुवात असून, राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती हेच खरेशासनाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर, कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी‍ निमित्त आयोजित येथील बाजार समितीच्या मैदानावर ह्लकृषी पंढरी 2017ह्वया कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते सुधारकपंत परिचारक, बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काही  वर्षात राज्यात दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या वर्षापासून राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील 50 टक्के जनता शेतीवर अवलंबून असताना राज्याच्या सकल उत्पन्नात केवळ 10 टक्के शेतीचा वाटा आहे. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्याला सक्षम करुन शेतीतील गुंतवणुक वाढविण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामातून राज्यातील 12 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेआहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उन्नत शेती, संपन्न शेती अभियान राबविण्यात आले आहे.     

शेती व ग्रामविकासावर भर देऊन महाराष्ट्र बदलण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सातत्याच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी महाराष्ट्र शासनाने केली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रती कुटुंब कर्जाची रक्कम तुलनेने कमी आहे. तरीही शासनाने सरसकट प्रत्येकी दीड लाख रुपये कर्जमाफी दिली असून त्यामुळे राज्यातील एकूण ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. वन टाईम सेटलमेंट साठी पहिल्या टप्प्यात सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी बँकांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदतीची कर्जही माफ करण्यात येणार आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. शेतीला २४ तास अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी सोलर फिडरची नवीन योजना शासनाने आणली आहे. राळेगणसिद्धी गावातून या योजनेची सुरवात करण्यात येणार असून वीज वाचवणारे आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी पंप शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्यातील दलालांची साखळी तोडण्यासाठी नवे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शेती व ग्रामविकासावर भर देऊन महाराष्ट्राचे चित्र बदलायचे आहे. शाश्वत शेती करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील असून सरकारने उचित दिशा निवडल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, निसर्गाच्या दुष्ट चक्रातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांसह साधू संतांच्या विचारांवर सरकारचे मार्गक्रमण सुरु आहे. पांडुरंग फुंडकर म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कृषी पंढरी सारख्या कृषी प्रदर्शनातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्यास मदत होणार आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. शेतकऱ्याला, गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी अनेक यशस्वी निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच या योजनेच्या माध्यमातून एक लाख ३२ हजारांच्या कर्जमाफीचे लाभार्थी असलेले शेतकरी श्रीमंत आऊबा हेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडीची प्रतिमा देऊन विशेष सत्कार केला व शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचे आभार मानले.

Web Title: Debt relief is the only real goal - Debendra Phadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.