कर्जमाफीवर विरोधकांची माघार
By admin | Published: December 15, 2015 04:04 AM2015-12-15T04:04:51+5:302015-12-15T04:04:51+5:30
वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच
- अतुल कुलकर्णी, नागपूर
वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच आपल्या मागणीवरून माघार घेतली. माघार घेताना सन्माननीय तोडगा काढा असा लटका आग्रह विरोधकांनी धरला आणि अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सफळ शिष्टाई करीत दुसऱ्या आठवड्यात सुरू केले.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत कामकाजात भाग घ्यायचा की नाही, यावर बरीच चर्चा झाली. कामकाजात सहभागी तर होऊ पण विरोधकांची प्रतिष्ठा राहिली पाहिजे असा तोडगा काढला नाही तर आपली बदनामी होईल असा सूर बैठकीत निघाला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यासह सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावली. आमचा मान राहिला पाहिजे, असा आग्रह विरोधकांनी त्या बैठकीत धरला. शेवटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, असे गिरीश बापट विरोधी पक्षनेत्यांसोबत माध्यमांना जाऊन सांगतील आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर परिषदेत शेतकरी आत्महत्या विषयावर आणि विधानसभेत पुरवणी मागण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू होईल असे ठरले. त्यानुसार कामकाज सुरू झाले.
त्यातही विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित राजकारण केले. कितीही भाषणे झाली तरी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळणार नाही यासाठी विधानसभेत दुष्काळावरील चर्चा रात्री उशिरा सुरू होईल असे नियोजन करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. रात्री ७ च्या सुमारास ही चर्चा झाली. वरच्या सभागृहात मात्र विरोधकांचे बहुमत असल्याने पुरवणी मागण्यांवर उद्या चर्चा करू, आधी दुष्काळावर बोलू असे सांगत सभापतींनी दुष्काळावरची चर्चा सुरू केली.
मात्र पहिल्या आठवड्यात काँग्रेसने काढलेल्या मोर्चासाठी सभागृह बंद पाडले गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला जायचे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृह बंद पाडले या आरोपाला पुष्टी देणारी आजची कृती होती अशी प्रतिक्रिया नंतर भाजपाच्या नेत्यांनी दिली. नाव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले पण कामे मात्र दोन्ही काँग्रेसनी आपापली उरकून घेतल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होती. दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. चर्चेला उत्तर मिळाल्यानंतरच सरकार सकारात्मक आहे म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट होणार आहे.
सगळे कसे शांत शांत
- अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत पार पाडले जाणार हे स्पष्ट झाले आणि अधिवेशन परिसर सुस्तावला. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर तर विधान परिषदेत दुष्काळावर चर्चा सुरू झाली. बोलणारे मोजके सदस्य बाहेर पडले.