कर्जमुक्ती २०१६ नव्हे २०१७ पर्यंतची हवी- उद्धव ठाकरे

By admin | Published: June 29, 2017 02:09 PM2017-06-29T14:09:59+5:302017-06-29T15:27:28+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (29 जून) एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Debt relief should not exceed 2017 till 2017 - Uddhav Thackeray | कर्जमुक्ती २०१६ नव्हे २०१७ पर्यंतची हवी- उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती २०१६ नव्हे २०१७ पर्यंतची हवी- उद्धव ठाकरे

Next
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 29 -  शेतकऱ्यांबाबत भाजपचे मंत्री जशी विधाने करतात, त्यावरुन ते कर्जमाफी देतील असे वाटते का? आम्ही आमचा इंगा दाखविल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला़ परंतु त्याचे श्रेय सेना घेणार नाही़ कर्जमाफीचा निर्णय जाहिर झाला असला तरी, शेतकरी कर्जमुक्त झाला नाही़ त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आम्ही सरकारला सोडणार नसून कर्जमुक्ती २०१६ नव्हे तर जून २०१७ पर्यंत हवी असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
 
शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी नांदेडात आले होते़ येथील भक्ती लॉन्सवर आयोजित मेळाव्यात ते म्हणाले, आजपर्यंत अनेक पक्षांची सरकारे आली अन् गेली़ परंतु आठवणीतील कर्जमाफीचा हा सर्वात मोठा निर्णय आहे.  या निर्णयाचे श्रेय घेण्याचे अनेकांकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु मी या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी आलो नाही़ विरोधी पक्षात असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेना रस्त्यावर होती़ अन् आज सत्तेत असतानाही शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सेना रस्त्यावर उतरत आहे. कारण आम्हाला खुर्चीचा मोह नाही़ खुर्ची येते अन् जाते. परंतु तुमचे-आमचे नाते कायम टिकले पाहिजे.
 
विरोधकांकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली़
वातानुकुलित गाडीतून फिरत-फिरत त्यांनी संघर्ष केला़ तर दुसरीकडे शेतकऱ्यांबाबत मोबाईलची बिले, कर्जमुक्ती फॅशन झाली, रडतात साले अशी वक्तव्ये करणारे मंत्री ज्या पक्षात आहेत, तो पक्ष कधी कर्जमाफीचा निर्णय घेईल असे वाटते का? कर्जमाफी ही शेतकऱ्यांनी मिळविली आहे़ त्यामुळे त्याचे श्रेय कुणीही घेवू नये.
 
या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे़ परंतु प्रत्यक्षात हा लाभ मिळाला की नाही हे शिवसैनिकांनी मोजून घ्यावे. सरकारनेही २०१६ पर्यंतची कर्जमुक्तीची तारीख वाढवून ती जून २०१७ करावी़ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना तरी, सरकारने रडू नये असा टोलाही त्यांनी लगाविला़ शेतकरी कर्जमुक्ती हा तात्पुरता उपाय आहे. पुन्हा त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढू नये म्हणून सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत़ शेतकऱ्यांना वीज,पाणी मिळाले पाहिजे़ शेतकऱ्यांना शब्दांच्या खेळात फसू देणार नाही़ जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक घरी जाणार नाही असाही इशारा ठाकरे यांनी दिला.
 
तत्पूर्वी आ.हेमंत पाटील यांनी प्रास्ताविकात सेनेने कर्जमुक्ती सरकारला झुकवून घेतली असून शिवसेनेमुळेच शेतकरी आंदोलनाला धार आल्याचे सांगितले. यावेळी सेनेचे सचिव खा़विनायक राऊत, खा़चंद्रकांत खैरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, पालकमंत्री अर्जून खोतकर, आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़नागेश पाटील आष्टीकर, आ़सुभाष साबणे, लक्ष्मणराव वडले, प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार, मिलिंद देशमुख, भूजंग पाटील, बाळू खोमणे, बालाजी कल्याणकर, उमेश मुंडे यांची उपस्थिती होती़.
 
(अखेर मिळाली कर्जमाफी)
राज्यातील ३६ लाख शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा तसेच, त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी जास्तीची रक्कम भरल्यास त्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची तरतूद असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आदेश सहकार विभागाने आज जारी केला. कर्जमाफीचा आदेश काढून देवेंद्र फडणवीस सरकारने शब्द पाळला.
(कर्जमाफी, हमीभाव एकाच वेळी मिळावा)
 
या कर्जमाफीचा फायदा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ३४ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे,
 
असे सरकारचे म्हणणे आहे. आजच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१२ पासून ३० जून २०१६ रोजी थकित असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (वनटाईम सेटलमेंट) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल. याचा अर्थ चार लाख रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्याने अडीच लाख रुपये भरल्यास त्याला दीड लाखाची माफी मिळेल. असे एकूण आठ लाख शेतकरी आहेत.
 
२०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०१६-१७ या वर्षात घेतलेल्या कर्जाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत पूर्णत: परतफेड केल्यास त्यांना २०१५-१६ मधील परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दिली जाईल. तथापि, शेतकऱ्यांनी परतफेड केलेली रक्कम १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम शासन देईल.
 
२०१२-१३ ते २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील त्यांना वरील योजनेचा लाभ देण्यात येईल. तथापि, जे थकित नाहीत त्यांना २५ हजार रुपये शासनामार्फत अदा करण्यात येतील.
 

शेतकऱ्यांचा सत्कार: शेतकरी संवाद अभियानाअंतर्गत नांदेडमधील आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगाराम कोरडे, गणपत बोभाडे, गोपीनाथ कदम, बापूराव कल्याणकर, शंकरराव कल्याणकर या पाच शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला़

Web Title: Debt relief should not exceed 2017 till 2017 - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.