अडचणीतील शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ
By Admin | Published: April 25, 2017 02:14 AM2017-04-25T02:14:49+5:302017-04-25T02:14:49+5:30
सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासारखी सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे ज्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय उभेच राहता येत नाही
कोल्हापूर : सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासारखी सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे ज्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय उभेच राहता येत नाही, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार तयार असल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कर्जमाफी करावीच लागेल, असे ठासून सांगून महसूल मंत्री पाटील म्हणाले, ‘जो शेतकरी कर्जात बुडालेला आहे, त्यांचाच फक्त कर्जमाफीसाठी विचार व्हावा, असे सरकारला वाटते. त्यासाठी विरोधकांसमवेत चर्चेला बसण्याची सरकारची तयारी आहे. त्यांनी प्रस्ताव द्यावा सरकार त्यावर जरूर विचार करेल. प्रत्येक गावातील असे निकड असलेले शेतकरी किती आहेत, याचा अभ्यास करावा लागेल. ते किती असतील त्याची माहिती घेऊन त्यांनाच कर्जमाफी दिली जावी, अशी सरकारची भूमिका आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना जशी राबविली जाते, तसा कर्जमाफीचा विचार करावा लागेल. (प्रतिनिधी)