कर्जमाफीत सावळागोंधळ; एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाखो लाभार्थी शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:04 AM2017-10-25T11:04:48+5:302017-10-25T11:07:10+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे.
मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दिवाळीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील गोंधळाची परिस्थिती आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले लाखो लाभार्थी या यादीत आहे.
उदाहरणासाठी, दिलीप काचळे या शेतकऱ्याचा आधार क्रमांक 111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111 आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचाही आधार कार्ड क्रमांक 111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111 आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक अकाऊंट नंबर एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आम्हाला एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाभार्थी बघून आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर एकच असणं, हे आम्हाला विचारात टाकण्यासारखं आहे, असं . माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम यांनी म्हंटलं आहे.
याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाती आणि एका शेतकऱ्याचं नाव एकाच यादीत तीन वेळा असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती याआधीही समोर आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील शेतकरी भारत तांबे यांनी 1 लाख 40 हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असताना त्याला फक्त 10 हजार रुपयाच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. दुसरीकडे राज्य सरकारने 89 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांच्या जवळपासच राहील, असा अंदाज आहे.