कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार

By admin | Published: July 7, 2017 04:05 PM2017-07-07T16:05:43+5:302017-07-07T16:55:00+5:30

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून, सरकारने लादलेल्या अटी व शर्तींमध्ये शेतकरी भरडला जात आहे.

Debt waiver scheme fraudulent - Ajit Pawar | कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार

कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 07 - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून, सरकारने लादलेल्या अटी व शर्तींमध्ये शेतकरी भरडला जात आहे. त्यातच सरकारच्याच आदेशाने शेतकऱ्यांनी कर्जाचे पुर्नगठण केले. मात्र, कर्जाचे पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीतून वगळून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी केला.
नगर येथील सहकार सभागृहात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला़ त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते, म्हणाले, अनेक लोकप्रिय घोषणा देऊन सध्याचे सरकार सत्तेत आले. लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेल्या सरकारने लोकांना बुरे दिन आणले आहेत. भाजीपाल्याला भाव नाही, दूधाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. राष्ट्रवादी, काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर सरकारने या संघर्ष यात्रेला विरोध करण्यासाठी संवाद यात्रा काढली. मात्र, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपाची हाक देत शहरांकडे जाणारा भाजीपाला, दूध अडविले. त्यामुळे सरकारला जाग आली आणि कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा करताना सरकारने वारंवार अध्यादेश बदलले. रोज नवीन नियम व नवीन घोषणा सरकार करीत आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेले नाही़ ही कर्जमाफी देताना सरकारने अनेक अटी व शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे या कर्जमाफीपासून अनेक गरजू शेतकरी वंचित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी होती, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुर्नगठणाचे आदेश सरकारने काढले होते. मात्र, आता कर्जमाफी देताना हेच शेतकरी वगळले आहेत. त्यामुळे खरे गरजू शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. नगर जिल्ह्यात पुर्नगठण झालेले ४० हजार ३१५ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत़ या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

शिवसेना ढोंगी...
राज्यमंत्रिमंडळात शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे मंत्री कॅबीनेटमध्ये सरकारच्या निर्णयाशी सहमत असतात. मात्र, शिवसेनेचे नेते बाहेर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतात. हा सरळसरळ ढोंगीपणा आहे. त्यांना विरोधच करायचा तर सभागृहात विरोध का केला जात नाही़ शिवसेनेने बँकांपुढे ढोल वाजवण्याचे नाटक करण्यापेक्षा मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर ढोल वाजवावेत. शिवसेना सत्तेत आहे, हेच अजून त्यांना कळले नाही, असे पवार म्हणाले.

मध्यावधींची शक्यता नाहीच...
भाजप, शिवसेना १५ वर्षांनंतर सत्तेत आली आहे़ त्यामुळे ते सत्ता सोडणार नाहीत. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा त्यांचा खेळ सुरु आहे. रत्यावर येऊन राज्य सरकारविरुद्ध भांडायचं आणि सभागृहात गेल्यावर त्याच सरकारला टाळी द्यायची, अशी निती शिवसेनेची आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीच. निवडणुका घेताना ते जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहेत, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

केंद्राचा अनागोंदी कारभार...
केंद्र सरकारने नोटा बंदी करुन किती काळे धन बाहेर काढले, किती पैसा जमा झाला, याचा ताळेबंद सादर करावा. नोटा बंदीने पिळलेल्या जनतेला आता पुन्हा जीएसटी लागू करुन छळले आहे. बेरोजगारी वाढत आहे, व्यापारी संतापले आहेत, महिलांवर अन्याय होत आहेत, मागासवर्गीय, अल्पसंख्याक लोकांचे खून पाडले जात आहेत, कामगारांचे संरक्षण करणारे कायदे कमी केले जात आहेत, असा सर्व अनागोंदी कारभार देशात सुरु आहे, अशा शब्दात पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Web Title: Debt waiver scheme fraudulent - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.