कल्याणची ‘डेक्कन क्वीन’ अर्थात शोभा
By admin | Published: August 25, 2016 03:46 AM2016-08-25T03:46:32+5:302016-08-25T03:46:32+5:30
२१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे.
मुरलीधर भवार,
कल्याण- महिला पोलीस या नात्याने कर्तव्य बजावत असतानाच कल्याणच्या शोभा देसाई यांनी ‘आयडीबीआय लाईफ इन्शुरन्स हाफ मॅरेथॉन-२०१६’ या स्पर्धेत २१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून ठाणे पोलीस आयुक्तालयाची मान उंचावली आहे. शोभा यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. सिंगापूर येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी चौथा व सातव्या क्रमांकाची बाजी मारली.
शोभा या पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर १९९५ सालापासून कार्यरत आहेत. सध्या त्या कल्याणमधील आग्रा रोडवरील पंचधारा सोसायटीत राहतात. त्यांना एक मुलगी आहे. ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. आईचा धावण्याचा गुण तिच्यातही आहे.
शोभा यांना शालेय जीवनापासूनच धावण्याची आवड होती. मे महिन्यात पार पडलेल्या आशियाई मास्टर्स स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत दोन किलोमीटर अंतरात चौथ्या स्थानावर व पाच किलोमीटर अंतरात सातव्या क्रमांकावर त्या आल्या आहेत. २४ जुलै रोजी मुंबईतील ‘रन इंडिया रन’ या २०१६ सालच्या १० किलोमीटरच्या स्पर्धेत शोभा यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. ही स्पर्धा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडली होती. ७ आॅगस्ट रोजी मान्सून दहा किलोमीटर स्पर्धेत शोभा यांनी पुन्हा पहिल्या क्रमांकाची बाजी मारली. शोभा सध्या कल्याण डोेंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या पोलीस संरक्षण पथकात कार्यरत आहेत. स्पर्धेची तयारी त्या स्वखर्चातूनच करतात. त्यांचा अर्धा पगार त्यांच्या धावण्याच्या सरावावर खर्च होतो. सिंगापूर येथे भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेलेल्या शोभा यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ३५ हजार रुपयांची मदत केली होती. तसेच तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला होता. पोलीस दलातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सूट दिली जाते.
>पोलिस दलात शारीरीक फिटनेसला खूप महत्व आहे. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शोभा या अगदी फिट आहेत. पोलीस दलात अनेक लोक विविध कामगिरी करीत असता. अनेकांकडे क्रीडा व अन्य कौशल्ये अंगभूत असतात. त्यांना वाव मिळत नाही. त्यांचे कौतुकही केले जात नाही. त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळाला तर खरोखरच त्यांच्या मेहनतीचे चीज होऊ पोलीस दलाचे नाव आणखीन मोठे होण्यास मदत होऊ शकते. शोभा यांनाही मदतीच्या हाताची आवश्यकता आहे. त्यांना मदत मिळाल्यास त्या अधिक चमकदार कामगिरी करु शकतात.