यशवंतरावांमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण

By admin | Published: March 13, 2016 04:58 AM2016-03-13T04:58:14+5:302016-03-13T04:58:14+5:30

यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणावर प्रचंड विश्वास होता. सत्ता, निर्णय घेण्याची प्रक्रिया शेवटच्या माणसाच्या हातात असावी

Decentralization of power due to Yashvantra Ravan | यशवंतरावांमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण

यशवंतरावांमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण

Next

नाशिक : यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणावर प्रचंड विश्वास होता. सत्ता, निर्णय घेण्याची प्रक्रिया शेवटच्या माणसाच्या हातात असावी, या विचाराने त्यांनी राज्यात पंचायतराजच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतून पुढे कर्तृत्ववान राजकीय पिढी घडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे पवार यांनी उद्घाटन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन, तसेच विशाखा काव्य व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले.
पवार यांनी यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांचे अनेक किस्से सांगितले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात यशवंतरावांना प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागले. सामाजिक सुधारणा की स्वातंत्र्यासाठी लढा, असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू झाले आणि ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन तुरुंगात गेले. १९४८ मध्ये त्यांनी राज्य परिवहन महामंडळाची स्थापना केली. १९५६ मध्ये विधिमंडळाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.
अत्यंत अस्वस्थतेच्या काळात त्यांनी राज्य सांभाळले. गुजरात व महाराष्ट्र वेगळे होऊ नये, अशी नेहरूंची इच्छा होती; मात्र चव्हाणांनी अत्यंत कौशल्याने इंदिरा गांधींमार्फत नेहरूंचे मन वळवले आणि १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती घडवून आणली. राज्य स्थापनेनंतरही त्याला दिशा देताना ‘पंचायतराज’ची स्थापना करीत कर्तृत्ववान राजकीय नेत्यांची पिढी घडवली. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्याकडे फक्त नऊ एकर जमीन, बँकेत २७ हजार रुपये व पाच हजार ग्रंथ होते. (प्रतिनिधी)
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कवी अरुण नाईक यांना २१ हजारांचा प्रथम पुरस्कार, माळशिरस (जि. पुणे) येथील बालिका ज्ञानदेव यांना पंधरा हजार रुपयांचा द्वितीय, तर जळगाव येथील ‘लोकमत’च्या वरिष्ठ मुद्रितशोधक डॉ. अस्मिता गुरव यांना दहा हजार रुपयांच्या तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील प्रेरणा सहाने यांना २१ हजार रुपयांच्या रुक्मिणी पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रा. आनंद पाटील यांच्या ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य प्रथम पुरस्कार कुडाळ (जि. रत्नागिरी) येथील कवी अरुण नाईक, द्वितीय पुरस्कार लोणंद (माळशिरस, जि. पुणे) येथील कवयित्री बालिका ज्ञानदेव, तर तृतीय पुरस्कार डॉ. अस्मिता गुरव यांना देण्यात आला.

Web Title: Decentralization of power due to Yashvantra Ravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.