युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:23 PM2018-10-22T18:23:40+5:302018-10-22T20:28:36+5:30
केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी थेट अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे.
मुंबई - केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने युतीबाबत आताच निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेऊ, असा इशारा भाजपाध्यक्षांकडून सेनेला देण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपाकडून अशाप्रकारचे कुठलेही अल्टिमेटम आले नसल्याचे सांगत शिवसेनेने या वृत्ताचे खंडन केले आहे.
मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे भाजपामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. भाजपावर टीका करायची पण युतीबाबतचा संभ्रमही कायम ठेवायचा, अशी खेळी सेना नेतृत्वाकडून खेळण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा नेतृत्वाकडून शिवसेनेला युतीबाबत आताच निर्णय घ्या, असे थेट अल्टिमेटमच देण्यात आले आहे. जर शिवसेनेने युतीबाबत आताच काही स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर राज्यातील विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जातील, असा इशारा अमित शाह यांनी शिवसेनेला दिला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना अद्यापही स्पष्ट भूमिका घेत नसल्याने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी भाजपाकडून ही चाल खेळण्यात येत असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.