७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या!...तर क्रांतीदिनापासून राज्यभरात ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:52 AM2018-08-03T01:52:01+5:302018-08-03T01:52:45+5:30
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर ७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या, अशी डेडलाईन परळी (जि. बीड) मराठा क्रांती मोर्चाने शासनाला गुरुवारी दिली.
मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर ७ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या, अशी डेडलाईन परळी (जि. बीड) मराठा क्रांती मोर्चाने शासनाला गुरुवारी दिली. मुदतीत निर्णय न झाल्यास ९ आॅगस्टपासून राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, राज्यात गुरुवारी देखील ठिकठिकाणी आंदोलन झाले.
परळीतील ठिय्या आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनस्थळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक झाली. त्यानंतर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. य्या बैठकीस पुण्याचे आबासाहेब पाटील यांच्यासह नानासाहेब जावळे, महेश डोंगरे (सोलापूर), विवेकानंद बाबर (सातारा), संजय सावंत (औरंगाबाद), सुनील नागणे (तुळजापुर) आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षण व आंदोलनासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती बरखास्त करावी. तसेच सर्व मागण्यांचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी परळी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या ठरावासोबत लेखी द्यावे, तरच आंदोलन स्थगित करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. अहमनदगरमध्येही बैठक होऊन असाच निर्णय झाला. बैलगाडी, ट्रॅक्टर गुराढोरासंह मराठा समाज बांधव ९ आॅगस्टला ठिय्या आंदोलन करणार आहेत.
पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या
पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील फुलंब्रीजवळ पाल फाटा येथे दीड तास रास्ता रोको केला.
आंदोलकांनी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.
मराठा तरुणाबरोबर एका दलित तरुणानेही शोले स्टाईल आंदोलन केले.