युतीचा फैसला १२ जानेवारीला?

By admin | Published: January 6, 2017 04:38 AM2017-01-06T04:38:21+5:302017-01-06T04:38:21+5:30

आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ठाणे शहरात सुमारे १० वर्षांनंतर भाजपाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे

Decision on the 12th of January? | युतीचा फैसला १२ जानेवारीला?

युतीचा फैसला १२ जानेवारीला?

Next

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ठाणे शहरात सुमारे १० वर्षांनंतर भाजपाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील आगामी झेडपी आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार असून शिवसेनेबरोबर युती करायची की नाही, या बाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली.
ठाण्यात घेण्यात येत असलेली ही बैठक येत्या १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत टिपटॉप प्लाझा येथे होणार असल्याची माहिती भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. या बैठकीला भाजपाचे सर्व आमदार, खासदार, केंद्रीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, प्रवक्ते आदींसह इतर तब्बल ३५० पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असून काही प्रस्तावही या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वतीने मांडण्यात येणार आहेत. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेच्या अनुषंगानेदेखील या वेळी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.


आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती
करणार का, असा सवाल केला असता संदीप लेले यांनी सांगितले की, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु, या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून कसे येतील, यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी ठाणे महापालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने या बैठकीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाण्यात भाजपाची स्थिती फारशी चांगली नसली तरीदेखील ज्या पद्धतीने त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतांची जोरदार मुसंडी मारली, त्याप्रमाणे महापालिका निवडणुकीतही काही चमत्कार घडवेल, असे दिसत आहे.

Web Title: Decision on the 12th of January?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.