मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय
By Admin | Published: November 9, 2016 03:02 AM2016-11-09T03:02:36+5:302016-11-09T03:02:36+5:30
राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही
पुणे : राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली.
गणेश कला क्रीडा मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, गटनेते किशोर शिंदे उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘जातींचा विचका व्ही. पी. सिंग यांनी केला. उत्तर प्रेदशात ढाब्यावर चहा देतानाही जात विचारली जाते. आपल्याला महाराष्ट्राचा उत्तर प्रेदश, बिहार करायचा का? आतापर्यंत कुठल्याही जातीच्या पुढाऱ्याने जातींचे भले केलेले नाही. निवडणुकांसाठी वापर करून सोडून देतील.’’
पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नये म्हणून आंदोलन केले, त्यावेळी मांडवली केल्याचा आरोप झाला. या भिकारड्यांकडून मी विकला जाणार नाही. आमचा जवान शहीद होतोय आणि आमचे निर्माते पाकच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत आहेत. मला यात यश मिळाले म्हणून अनेकांना पोटशूळ झाला असे ‘ए दिल मुश्किल’ प्रकरणावरून झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दोन-दोनचे प्रभाग असताना नगरसेवकांना काम करता येत नव्हते, एखाद्याने विकासकामाचा प्रस्ताव दिला की दुसरा नगरसेवक त्याला विरोध करायचा. आता ४-४चे प्रभाग केले आहेत. आता चौघे काय कॅरमवर सोंगटी खेळत बसणार का? यातून लोकांच्या हाताला फक्त पावडरच लागेल अशी टीका त्यांनी केली.
मोदींच्या घोषणेने झाकोळले भाषण
मराठी वृत्तवाहिन्यांसाठी राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मोठी पर्वणी असते. मंगळवारी राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांवर केवळ याचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने ठाकरे यांचे भाषण झाकोळले गेले.
मराठी म्हणून अन्याय झाला
राज ठाकरे यांनी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा संदर्भ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीचे उदाहरण दिले. मात्र त्या अधिकाऱ्यावर जातीमुळे नव्हे तर मराठी असल्यामुळे अन्याय झाला आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पक्ष बदलणारे फेरीवाले
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोघा नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याची खिल्ली उडवताना ठाकरे यांनी या पक्षांतर करणाऱ्यांना फेरीवाल्याची उपमा दिली.