एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय स्थगित, फक्त संपकाळातील पगार कापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:25 PM2017-10-31T20:25:43+5:302017-10-31T20:29:48+5:30
ऐन दिवाळीत संपावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई - ऐन दिवाळीत संपावर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कापण्यात येणार आहे. पण 8 दिवसांची अर्जित रजा दिल्या ही वेतन कपात होणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर त्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर अखेर ही वेतनकपात मागे घेण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने संपकरी कर्मचा-यांची ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार ४ दिवसांचे वेतन कपात करा, तसेच त्या व्यतिरिक्त झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी ८ दिवस, याप्रमाणे एकूण ३६ दिवसांचे वेतन कपात करणे आवश्यक आहे. मात्र, कामगारांच्या वेतनातून करावयाच्या वैधानिक वजावटी आणि त्यांना दैनंदिन खर्चासाठी आवश्यक असणारे वेतन यांचा विचार करून, या ३६ दिवसांपैकी आॅक्टोबर महिन्यात ४ दिवसांची वेतन कपात करण्यात येणार आहे, तर उरलेल्या ३२ दिवसांची वेतन कपात पुढील ६ महिन्यांत करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व विभाग आणि अधिका-यांनी कार्यवाही करावी, असे महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीचे हे परिपत्रक राज्यातील कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था आणि विभाग नियंत्रक यांना पाठविण्यात आले होते.
महामंडळातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारण्यात आला होता. संपात सर्व पक्षीय संघटनांनी पाठिंबा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशील ठरवत, कर्मचा-यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते.