नोटा हद्दपारीचा निर्णय आत्मघातकी - अभ्यंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 06:00 AM2016-11-15T06:00:44+5:302016-11-15T06:00:44+5:30
केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे
नाशिक : केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे. एकीकडे या नोटा बंद करून दोन हजारांची नोट काढून काळा पैसानिर्मितीला पुनर्चालना दिल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी केली.
बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईजतर्फे नाशिक विभागातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शाखांच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी दहावे द्वैवार्षिक अधिवेशन झाले. भारतातील बहुतांश संपत्ती मोजक्या धनाढ्य लोकांच्या हाती असून, सर्वसामान्य माणूस या निर्णयाने भरडला जात असल्याने नोटा बंदीच्या निर्णयाचे मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. नोट बंदीच्या निर्णयानंतर रात्रभर सोन्याची दुकाने उघडी असताना आयकर खात्याकडून मुंबई, दिल्लीसह मोठ्या शहरांत कोठेही छापे टाकून काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. मॉरिशससह परदेशात बहुतांश उद्योजकांनी काळ्या पैशांची गुंतवणूक केली आहे. सरकार
या देशांना शून्य टक्के कर या निर्णयानुसार गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देते. त्यामुळे आपल्याच देशातील पैसा बाहेरच्या देशात जाऊन पुन्हा पांढरा करण्याचा घाट घातला जात असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.
सरकारने राबविलेली योजना चांगली असली, तरी त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. आयकर खात्यात सुमारे ३० हजार पदे रिक्त असताना हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र सोन्याच्या काळ्या बाजारावर कारवाई करण्याचे आदेश आयकर विभागाला का दिले नाही, असा सवालही अभ्यंकर यांनी केला. (प्रतिनिधी)