एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय
By admin | Published: December 2, 2015 03:01 AM2015-12-02T03:01:02+5:302015-12-02T03:01:02+5:30
खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीचे कमी झालेले प्रवासी पाहता महामंडळाने ५00 एसी शिवनेरी व नॉन एसी स्लीपर बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात वाढ
मुंबई : खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीचे कमी झालेले प्रवासी पाहता महामंडळाने ५00 एसी शिवनेरी व नॉन एसी स्लीपर बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात वाढ करत आता एकूण एक हजार बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यातील ५00 बसेसची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
प्रथम टप्प्यात बसच्या यशस्वी सेवेनंतर याच निविदेतील किमान दरानुसार आणखी ५00 विविध प्रकारच्या बसही भाडेतत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून ३00 हायटेक बस लिझवर (ठराविक काळ किंवा मुदतीवर) घेण्यात येणार होत्या. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता. मात्र भाडेतत्वावर बस घेण्यात एसटी महामंडळाने रुची दाखवली. लिझवर बस घेणे परवडणारे नाही ते पाहता प्रस्ताव मागे पडल्याचे सांगण्यात आले.
भाडेतत्वावरील बस घेतल्यास यातील एसी बस मुंबई, ठाणे ते पुणे, औरंगाबाद , नाशिक मार्गावरही चालविण्यात येतील. स्लीपर बसेस या लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येतील.