खडसेंच्या अर्जावर चौकशी समितीचा उद्या निर्णय
By admin | Published: February 28, 2017 07:38 PM2017-02-28T19:38:18+5:302017-02-28T19:38:18+5:30
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंगळवारी सुनावणी झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी चौकशी समितीने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. दरम्यान, खडसे यांच्यावतीने चौकशी समितीपुढे सादर केलेल्या दोन अर्जावर बुधवारी चौकशी समिती निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.
महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. झोटींग यांची एक सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समिती गेल्या आठ महिन्यापासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. एमआयडीसीकडून साक्ष, पुरावे सादर करण्यात आले. मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी समितीने खडसे यांना सोमवारी अर्धवट राहिलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, सोमवारीच खडसे यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी दोन नवीन अर्ज चौकशी समितीसमोर सादर केले होते. यात चौकशी समितीने काही नवीन मुद्यांचाही चौकशीत समावेश करावा आणि साक्षीदारांची फेर साक्ष घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या अर्जावर मात्र एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी आक्षेप घेतला आहे. या अर्जावर न्या. झोटिंग यांची एक सदस्यीय चौकशी समिती बुधवारी निर्णय घेणार आहेत.
प्रकरण न्यायप्रविष्ट, बोलणे योग्य नाही...
एखादे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यास त्यावर भाष्य करणे योग्य नाही, हे सर्वसाधारण संकेत आहेत. हे प्रकरणही सध्या न्याय प्रविष्ठ आहे. तेव्हा यावर बोलणे योग्य होणार नाही.
- एकनाथ खडसे, माजी महसूल मंत्री