हा ‘लोकमता’चाच निर्णय

By admin | Published: June 12, 2015 11:05 PM2015-06-12T23:05:58+5:302015-06-13T00:51:03+5:30

विनोद तावडे : नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

This is the decision of 'Lokmata' | हा ‘लोकमता’चाच निर्णय

हा ‘लोकमता’चाच निर्णय

Next

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर - दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. अशी परीक्षा घेण्याची सूचना ‘लोकमत’ने केली. ती रास्त आणि नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविणारी असल्याने राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ती अमलात आणली, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगितले.
दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो नापास विद्यार्थ्यांना होतो. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का? असा प्रश्न मंत्री विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात प्रस्तुत प्रतिनिधीने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का? याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
मंत्री किंवा सरकार आश्वासने देतात. बऱ्याचवेळा ती केवळ आश्वासनेच राहतात. निर्णय झालाच तर तो खूप उशिराने होतो, असा एकूण सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, मंत्री तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच वर्षापासून अशी फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतले आणि राज्यातील लाखांवर नापास विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून दिली.

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील
तावडे यांच्या या गतिमान निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्य सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अतिशय संवेदनशील आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याबाबत सूचना विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याने तातडीने अमलात आणली. जनहिताची एखादी सूचना आली आणि ती योग्य वाटली तर सरकार तातडीने त्यावर कृती करून कार्यवाही करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: This is the decision of 'Lokmata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.